Satara Zilla Parishad 
सातारा

Satara News : वर्णे गटात ओबीसी विरुद्ध कुणबीमध्ये लढत?

भाजपचे वर्चस्व मात्र विरोधक एकवटल्यास आव्हान : उत्कंठा शिगेला

पुढारी वृत्तसेवा

वेणेगाव : सातारा तालुक्यातील वर्णे गटातील लढत अत्यंत लक्षवेधक ठरणार असून उमेदवार निश्चितीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण असल्याने ओबीसी विरुद्ध कुणबी अशी थेट लढत होण्याचे संकेत आहेत. प्रथमदर्शनी भाजपचे वर्चस्व असणाऱ्या या गटात विरोधकांना झगडावे लागण्याची शक्यता आहे. मात्र, ऐनवेळी बुधवारी होणाऱ्या घडामोडीनंतर विरोधक एकवटणार का? याबाबत उत्कंठा लागून राहिली आहे.

वर्णे गणामध्ये गोजेगाव, तासगाव, ब्राह्मणवाडी, धोंडेवाडी, मुळीकवाडी, जिहे, विजयनगर, फडतरवाडी, अंगापूर वंदन, वर्णे, धनगरवाडी (निगडी), जाधववाडी, निगडी तर्फ सातारा या गावांचा समावेश आहे. तर अपशिंगे मि. गणात अंगापुर तर्फ तारगाव, निगडी वंदन, चिंचणी पुनर्वसित, कामेरी, धोंडेवाडी, फत्त्यापूर, नांदगाव, लिंबाचीवाडी, जावळवाडी, देशमुखनगर, वारणानगर (लांडेवाडी), निसराळे, टिटवेवाडी, खोजेवाडी, मत्यापूर, आंबेवाडी, माजगाव, अपशिंगे मिलिटरी, वेणेगाव या गावांचा समावेश आहे.

या गटात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. मनोजदादा घोरपडे यांचे प्राबल्य आहे. वर्णे गटाचे यापूर्वी स्व.भीमरावदादा घोरपडे, श्रीमती मंगलताई घोरपडे व आ. मनोजदादा घोरपडे यांनी नेतृत्व केले असून वर्णे गटावर त्यांची चांगली पकड आहे. आ. मनोजदादा घोरपडे यांनी विकासकामांच्या माध्यमातून या गटावर वरचष्मा ठेवला आहे. हा गट त्यांचे होम ग्राऊंड आहे. या गटात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांचाही प्रभाव आहे. सद्यस्थितीत ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी वर्णे गटात मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना चार्ज केले आहे. ना. शिवेंद्रराजे यांची भुमिकाही या गटात निर्णायक ठरणार आहे. माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटातील उमेदवारीही औत्सुक्याचा विषय आहे. त्यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत.

वर्णे गटात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेळके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त भरत देशमुख (नांदगाव), राहुल गायकवाड (निसराळे), वैभव चव्हाण (वेणेगाव), विक्रम फडतरे (जिहे), पोपटराव पोतदार (वर्णे), माजी पोलीस पाटील सुरेश माने (टिटवेवाडी), सुरेश घोरपडे (निसराळे), संजय सावंत (जिहे), संकेत घोरपडे (तासगाव) हे इच्छुक आहेत. ते रणांगणात उतरणार का?, उतरले तर माघारीपर्यंत टिकणार का? हेही पहाणे महत्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार?, उमेदवारीवर भाजप नेत्यांचे एकमत होणार का? या सर्व गोष्टी औत्सुक्याच्या आहेत.

वर्णे गणात सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने यासाठी सौ. विद्या कणसे (अंगापूर), सौ. स्वप्नाली फडतरे (जिहे), सौ. स्नेहलता ताटे (तासगाव), सौ. दमयंती सुळके (विजयनगर), सौ.अश्विनी सावंत (जिहे) यांची नावे चर्चेत आहेत. तर अपशिंगे मिलिटरी गणासाठी अनुसूचित जाती आरक्षण असल्याने यासाठी पंकज मोरे, मानसिंग मोरे (अपशिंगे मिलिटरी), हिंदुराव शिंदे (वेणेगाव), बाळासाहेब चव्हाण (माजगाव), नवनाथ कंटे (फत्त्यापूर ), धोंडीराम भिसे (कामेरी) यांची नावे चर्चेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT