Satara ZP 
सातारा

Satara ZP: झेडपीच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

डॉ. प्रिया शिंदे व राजू भोसले यांच्याकडून कानपिचक्या : सदस्यांचा सन्मान राखा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : अधिकाऱ्यांनी प्रशासक राजवट असल्याचा अविर्भाव बाजूला ठेवून काम करावे. 40 हजार लोकांचे प्रतिनिधित्व करुन सदस्य निवडून येत असतात. त्यामुळे पदाधिकारी, सदस्यांचा मान सन्मान राखायला हवा. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वय साधत आपापल्या विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करावी. प्रत्येक वेळेस सर्वच खातेप्रमुखांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आड दडू नये, अशा शब्दात जि.प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे व उपाध्यक्ष राजू भोसले यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभागृहात सर्व विभागाच्या खातेप्रमुखांची आढावा बैठक सोमवारी झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून जनहिताची कामे गतीने मार्गी लावावीत. पदाधिकाऱ्यांना डावलण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तळागाळातील जनतेची कामे व्हावीत असे उत्तम काम करावे.

संबंधित विभागाशी निगडित असलेल्या विषयावर निर्णय हा विभागप्रमुखांनी घ्यावा. धोरणात्मक निर्णयाबाबत सर्वांशी विचारविनिमय करावा. पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर कुठेही गदा येवू नये यादृष्टीने अधिकाऱ्यांनी कामकाज करावे, असा शब्दात प्रिया शिंदे व राजू भोसले यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ऋषिकेश धायगुडे यांनी सर्वांनी समन्वय ठेवून काम करावे. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचे निराकरण प्रशासनाकडून होणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

सीईओ याशनी नागराजन म्हणाल्या, प्रत्येक विभागाच्या कामकाजाबाबत संबंधित खातेप्रमुखांना अधिकार आहेत. ज्या त्या पातळीवर त्यांनी निर्णय घ्यावेत. धोरणात्मक निर्णय घेताना सर्वांशी चर्चा करावी. प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच गतीने काम करावे. प्रशासन कुठेही कमी पडू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT