सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अधिकारी असलेल्या सुनील विठ्ठल रांजणे (रा. तामजाईनगर, करंजे) याने तलाठी पदासाठी भरती करतो असे सांगून सहा जणांना 1 कोटी 2 लाखांची फसवणूक केली. सातारा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
विठ्ठल प्रल्हाद रामदासी (वय 64, रा. सिंहगड, पुणे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, फसवणुकीची ही घटना जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या शाळेच्या मान्यतेच्या कामानिमित्ताने संशयित सुनील रांजणे याच्यासोबत ओळख झाली. यावेळी रांजणे यांनी माझी ओळख अनेक ठिकाणी आहे. मुलं भरती करायची असतील तर सांगा. तलाठी पदासाठी मी भरती करुन देईन, असे सांगितले. तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. तक्रारदार यांनी भरतीसाठी काय प्रक्रिया आहे, असे विचारले. त्यावेळी संशयिताने भरती करण्यासाठी प्रती उमेदवार 10 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी त्यांच्या दोन उमेदवारांसाठी रोख 20 लाख रुपयांची रक्कम दिली. ही रक्कम साताऱ्यात दिली. पैसे दिल्यानंतर नोकरी लागेल, असे वाटत असताना तसे झाले नाही. तक्रारदार यांनी पाठपुरावा केल्यानंतर संशयिताने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्याप्रमाणेच आणखी काही जणांची संशयिताने फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार तक्रारदार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.