Satara ZP 
सातारा

Satara ZP: पदाधिकाऱ्यांचे दोन दिवस झेडपीसाठी

‘पुढारी‌’च्या दणक्यानंतर निर्णय : नागरिकांची गैरसोय टळणार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : तब्बल आठ वर्षांनंतर सातारा जिल्हा परिषदेला नूतन पदाधिकारी मिळाले आहेत. दैनिक ‌‘पुढारी‌’ने लोकभावना लक्षात घेवून पदाधिकाऱ्यांचा कारभार सुरु न करण्याच्या पद्धतीवर टिका केली होती. तसेच पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना वेळ देणे गरजेचे असल्याची भूमिका मांडली होती. याची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभापती हे दर सोमवारी व गुरुवारी पूर्णवेळ झेडपी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. पदाधिकाऱ्यांचा ‌‘झेडपीसाठी दोन दिवस‌’ या उपक्रमाने कारभार सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसह सभापती निवडीवेळीही बराच राजकीय खल झाला. त्यामुळे झेडपीच्या इतिहासात पहिल्यांदाचा भाजपाने झेंडा फडकवला आहे. पदाधिकारी निवडीनंतरही कारभाराची सुत्रे हाती घेतली गेली नव्हती. त्यावर दैनिक ‌‘पुढारी‌’ने आवाज उठवत ‌‘उचापत्या करुन पदावर; पदाधिकारी दिसेना खुर्च्यावर‌’ असे रोखठोक वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्ताची दखल घेत सर्वच पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले. तसेच पदाधिकारीही आपापल्या दालनात वेळेत उपस्थित रहात आहेत.

जि. प. अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभागृहात आढावा बैठक झाली या बैठकीत ‌‘पुढारी‌’च्या वृत्ताबाबत पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये दोन दिवस उपस्थित राहणे शक्य आहे. तर इतर दिवशी मतदारसंघात फिरावे लागणार आहे. तरीही जास्तीत जास्त झेडपीत उपस्थित राहून नागरिकांची कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सोमवारी व गुरूवारी या दोन दिवशी सर्व विभागाचे अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित असतात. मात्र इतर दिवशी मंगळवार, बुधवार व शुक्रवारी अधिकारी भेटीसाठी बाहेर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर सोमवार व गुरूवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समित्यांचे सभापती पूर्णवेळ झेडपी कार्यालयात उपस्थित राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच अधिकारीही कार्यालयात उपस्थित राहणार असल्याने या दिवशी जिल्ह्याच्या दूरवरून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची कामेही तत्काळ मार्गी लागणार आहेत. दैनिक ‌‘पुढारी‌’च्या वृत्तावर पदाधिकाऱ्यांनीही मिनीमंत्रालयात सोमवारी व गुरूवारी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT