सातारा

Satara ZP: पशुवैद्यकीय जागा हस्तांतरणावरून तणातणी

पहिलीच झेडपी सभा गाजली; सदस्यांमध्ये हमरीतुमरी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातील राजवाडा परिसरात असणार्‍या पशुवैद्यकीय दवाखान्याची जागा हस्तातंरण, आरोग्य केंद्राच्या बांधकाम, जिल्हा परिषद मालकीच्या जागेवरून आठ वर्षांनंतर झालेल्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या सर्वसाधारण सभेत चांगलीच तणातणी झाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्‍ये सर्वच विषयांवर खडाजंगी झाली. दिवसभर चाललेल्‍या या सभेत सदस्‍यांमध्‍ये हमरीतुमरीचे प्रकार झाले.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, सभापती तेजस्विनी कदम, ऋतुजा शिंदे, लता कर्णे, ऋषीकेश धायगुडे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद आदी उपस्थित होते.

सभा सुरू झाल्यानंतर सातारा शहरातील राजवाडा परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्याची जागा हस्तातंरण करण्याचा विषय चर्चेला आला. याला राजू शेळके यांनी विरोध करत झेडपीच्या मालकीच्या जागा आहेत, त्या जागा पुन्हा मिळणार नाहीत. त्या हस्तांतर करू नका. आपली मालमत्ता दुसऱ्याला देऊ नका. याबाबत गूप्त मतदान घ्या, अशी सूचना मांडली. त्‍यावर उपाध्‍यक्ष राजू भोसले यांनी ही जागा झेडपीची नव्‍हे, तर शासनाची असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. त्‍यावरून राजू भोसले व शेळके यांच्‍यात चांगलीच खडाजंगी झाली.

यावरून गोंधळ सुरू असतानाच अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी आवाजी मतदानाने हा विषय मंजूर करत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सर्व जागांची माहिती पुढील सभेत दिली जाईल, अशी ग्‍वाही दिली. अजित साळुंखेे यांनी याबाबत नगरपालिकेकडून १ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्‍याचे सांगितले. माणचे सभापती विक्रम शिंगाडे यांनीही या जागेवर आपली मालकी राहू द्या, अशी मागणी केली. वसंतराव मानकुमरे यांनी प्रत्‍येक विषयावर मतदान घ्‍यावे लागले, तर प्रत्‍येक गोष्‍टीचा बाऊ होईल, असे सांगितले.

संदीप मांडवे, दिलीप बाबर, महेश गाडे, गिरीश बनकर, उदय कबुले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विषयावर आवाज उठवून विरोध दर्शवला. पाल (ता. कराड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सध्या बांधकाम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे आहे. गेल्या ३ महिन्यांपासून हे काम बंद आहे. या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी माधवराव काळभोर यांनी केली. जिल्ह्यातील अन्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रश्‍नांवर गिरीश बनकर, बापू शिंदे, सह्याद्री कदम, कविता ओंबळे, वैशाली कांबळे यांनी आवाज उठवला. सदस्यांच्या प्रश्‍नांवर आरोग्य विभागामार्फत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन डॉ. महेश खलिपे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT