सातारा : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत शनिवारी भर दुपारी एका विभागात बिर्याणीचा सुंगध दरवळला. मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. आज सर्वच विभागात या बिर्याणीची खमंग चर्चा रंगली होती.
सध्या जिल्हा परिषदेमध्ये मार्च एंडची लगीनघाई सुरु आहे. झेडपी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अलिशान वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर व दक्षिण, लेखा, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, लघू पाटबंधारे, समाजकल्याण यासह अन्य विभागात बिले काढण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरु आहे. आपली कामांची बिले वेळेत मिळावी यासाठी ठेकेदारही विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी सांगतील त्या प्रलोबनाला बळी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कुठे जेवणावळीच्या पंगती तर कुठे आईस्क्रीम, ज्यूस, सरबतांना मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून वाढू लागली आहे.
मात्र शनिवारी दुपारी एका रिक्षातून बिर्याणीचा टोप जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाला. रिक्षातून एक व्यक्ती संबंधित विभागातून जावून तेथील कर्मचाऱ्यांना बोलावून घेवून आली. त्यानंतर त्या विभागातील 2 ते 3 कर्मचारी रिक्षाजवळ आले एकाने रिक्षातील खाण्याच्या सर्व पिशव्या घेतल्या तर दुसऱ्याने बिर्याणीचा टोप संबंधित विभागात नेला. त्यानंतर भरदुपारीच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिर्याणीवर ताव मारला . मात्र झेडपीत बिर्याणीचा सुगंध दरवळू लागल्याने सर्वत्र खमंग चर्चेला ऊत आला. ज्या विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिर्याणीवर ताव मारला त्यांची चौकशी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.