Satara News: झेडपीच्या लिफ्टमध्ये कर्मचारी अडकला Pudhari Photo
सातारा

Satara News: झेडपीच्या लिफ्टमध्ये कर्मचारी अडकला

अधिकारी व कर्मचार्‍यांची धावाधाव : एक तासाच्या प्रयत्नातून सुटका

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेच्या लिफ्टमध्ये गुरुवारी सायंकाळी कर्मचारी अडकला. त्याला वाचवण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची धावाधाव झाली. एक तासाच्या प्रयत्नानंतर या कर्मचार्‍याची सुटका झाल्यानंतर उपस्थितांचा जीव भांड्यात पडला.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी सकाळपासूनच कामानिमित्त नागरिकांची वर्दळ सुरू होती. येणारे नागरिक व कर्मचारी नेहमीच लिफ्टचा वापर करत होते. मात्र अधूनमधून वीजपुरवठाही खंडीत होत होता. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारासमोरील लिफ्टमधून ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी सागर फणसे हे जात होते. तेवढ्यात ही लिफ्ट बंद पडली. मात्र लाईट सुरू होती. लिफ्ट बंद पडल्यानंतर सागर फणसे गोंधळून गेले. त्यांनी लिफ्टमधील बेल बर्‍याचदा दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी संकेत शेडगे यांना मोबाईलवरून फोन केला.

त्याचवेळी जिल्हा परिषदेमधील लिफ्टमध्ये कर्मचारी अडकला असल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची धावाधाव सुरु झाली. तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांनीही लिफ्टकडे धाव घेतली. सुमारे 1 तास सागर फणस याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. एक तासाच्या कालावधीनंतर त्यांची लिफ्टमधून सुटका झाली.

कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन अनभिज्ञ...

जिल्हा परिषदेमधील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. लिफ्टमनसह प्रवेशद्वारासमोर बसणार्‍या कोणत्याही कर्मचार्‍यांना लिफ्टबाबत प्रशिक्षण नाही. आपत्कालीन स्थितीत महत्वाचे नंबरही या ठिकाणी नाहीत. त्यामुळे सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे. तरुण कर्मचारी असल्याने वेळ निघून गेली. मात्र त्या ठिकाणी वयस्कर व्यक्ती किंवा महिला अडकली असती तर प्रशासनाने काय केले असते? असा सवाल उपस्थितांमधून व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. एखादी घटना घडली की प्रशासनाला जाग येते? मात्र घडलेल्या प्रकारातून तरी प्रशासनाने बोध घेवून मार्ग काढावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT