सातारा : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षावर मित्रपक्ष असलेल्या भाजपने मोठा अन्याय केला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये भाजपने राष्ट्रवादीला अडचणीत आणले आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपच्या मैत्रीमुळे दुखावले गेले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपशी घरोबा नको, असा सूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यात आळवला.
दरम्यान, भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांची जरी महायुती राज्यामध्ये सत्तेवर असली तरी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्याला सोबत घेणार नाही, त्यामुळे आपल्याला आपल्या पद्धतीने पुढे जावं लागेल त्याची अजितदादांकडून कशी परवानगी आणायची ते मी बघतो. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीच्या घड्याळाची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन ना. मकरंद पाटील यांनी यावेळी केले.
साताऱ्यात पार पडलेल्या सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक सन्मान सोहळ्यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासमोरच भाजपकडून झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. या बैठकीला खा. नितीन पाटील, प्रभाकर देशमुख, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कार्याध्यक्ष संजय देसाई, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, शिवरुपराजे खर्डेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, शिवाजीराव महाडीक, उदय कबुले, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे- पाटील, विक्रमबाबा पाटणकर, प्रदीप विधाते, संजूबाबा गायकवाड, राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सुनील माने, श्रीनिवास शिंदे, युवकचे राज्य उपाध्यक्ष मनोज देशमुख, राजेंद्र लवंगारे, पृथ्वीराज गोडसे, डी. के. पवार, स्मिता देशमुख, प्रतिभा शिंदे, सीमा जाधव उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील म्हणाले, जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण हे सुदृढ आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर अनेक नेते मंडळींनी या जिल्ह्याची धुरा सांभाळली आहे. त्यांनी सुद्धा चव्हाणसाहेबांचा विचार जिल्ह्यामध्ये पुढे नेण्याचे काम केले. आणि त्याचाच परिपाठ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि या स्थापनेनंतर झालेली लोकसभेच्या आणि विधानसभेची निवडणूक यामध्ये एखादा अपवाद वगळता दहापैकी नऊ आमदार आणि दोन्हीच्या दोन्ही खासदार हे पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करून निवडून आले आणि तेव्हापासून कालपर्यंत हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण राज्यभर ओळखला जात होता.
परंतु दुर्दैवानं आज जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बघितली तर कुठेतरी हा जिल्हा यशवंत विचारांपासून बाजूला जातोय का काय? अशा पद्धतीचे चित्र सर्वांन समोर उभे राहिले आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कही खुशी कही गम असे चित्र दिसले. नगरपालिका निवडणुकीमध्ये महाबळेश्वर, पाचगणीत आपल्याला चांगले यश मिळाले. वाईतही मेजॉरिटी झाली पण नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले नाही. रहिमतपूरमध्ये मेजॉरिटी झाली, तिथेही नगराध्यक्षपद अवघ्या 50 मतांनी हुकले आहे. नगरपालिका निवडणुकीत आपल्यातल्याच काही माणसांनी गद्दारी केली आणि त्यामुळे पक्षाचा पराभव झाला. तर वाईमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचा कदापिही पराभव करू शकत नाही, ही वस्तुस्थिती असताना काही लोकांनी आतून उद्योग केले त्यांना तिकीट आपण देऊ शकलो नाही आणि त्या नाराजीतून चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले गेले.
खा. नितीन पाटील म्हणाले, नगरपालिकेमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं शक्य झालं नाही कारण मित्रपक्षांसोबत आघाडी करण्याच्या चर्चांमध्ये वेळ गेला. काही लोकांना विश्वासात घेण्यात आम्ही कमी पडलो. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये ही परिस्थिती येणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी 8 जानेवारीपासून साधारण 14 तारखेपर्यंत पक्ष कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करावे. यानंतर जिल्हा व तालुका पातळीवर आपण मुलाखती घेणार आहोत. पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या या जिल्हा पातळीवरुन एक कमिटी मकरंदआबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करणार आहोत. प्रत्येक तालुक्याचे अध्यक्षांचा समावेश या कमिटीत असेल. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना निश्चितपणे उमेदवारी देण्याचे निर्णय घेतले जातील. 1999 पासून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे, ती इथून पुढेही अबाधित ठेवायची आहे. त्या दृष्टीकोनातून ताकदीने कामाला लागावे.
नितीन भरगुडे पाटील म्हणाले, या देशामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा जन्म घातला ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या जिल्ह्यामध्ये आपण सर्वच कार्यकर्ते आहोत. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या जडणघडणीवर राष्ट्रवादीची वाटचाल सुरु आहे. तोच विचार कायम ठेवण्यासाठी आपल्याला पुढील काळात लढावे लागणार आहे.
सुनील माने म्हणाले, जिल्ह्यात राजकारणाची दिशा कुठे निघाली आहे? राजकारणात चिखल निर्माण झाला आहे. आता आपला दुश्मन कोण आहे? हे ओळखायला हवे. चुकीचे, दंडेलशाहीचे राजकारण आता खपवून घेवू नये. बुथ तिथे युथ ही संकल्पना राबवावी लागणार आहे.
प्रभाकर देशमुख म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये जागा वाटप करताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सखोल चर्चा व्हायला हवी.
प्रतिभा शिंदे म्हणाल्या, शिंदे फलटण राष्ट्रवादी काँग्रेस फलटण महिला तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. फलटण तालुक्याची परिस्थिती चांगली नाही तर अत्यंत वाईट झाली आहे. फलटणला नगरपालिका निवडणुकीत पक्षाला भाजपने सन्मानजनक जागा दिल्या नाहीत. त्यामध्ये कुठल्याही पक्ष कार्यकर्त्याला, पक्ष पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं गेलं नाही, ही सगळीच परिस्थिती जर पुढे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून होणार असेल तर चालणार नाही. जागा वाटप करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारात घ्यावे.