सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेक मतदारसंघांत बंडोबांचे झेंडे फडकले असले, तरी तब्बल 812 जणांनी निवडणूक रिंगणातून पळ काढला. यामध्ये 65 जिल्हा परिषद गटातून 295, तर पंचायत समिती गणांमधून 507 जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 630 जण आखाड्यात राहिले आहेत. काही ठिकाणी मातब्बरांनी शेपूट घातले.
नेत्यांच्या साम, दाम, दंड, भेद नीतीसह आमिषाच्या उताऱ्याने बंडोबा चांगलेच थंडोबा झाले. विशेष म्हणजे, अनेक अपक्षांनी लक्ष्मीदर्शन होताच डोळे मिचकावले, तर अनेक पक्षीय उमेदवारांनाही नेत्यांचा सुकाळीचा दम सोसला नाही. त्यांनीही शेपूट घालत उमेदवारी अर्ज मागे घेतले. माघारीमुळे आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, बहुतांश गट व गणांमध्ये बहुरंगी लढती होत आहेत.
जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी व पंचायत समितीच्या 130 जागांसाठी 630 उमेदवार आता रिंगणात राहिल्याने सर्वच ठिकाणी तिरंगी, चौरंगी व बहुरंगी अशा चुरशीच्या लढती होणार आहेत. माघारीच्या अखेरच्या दिवशी सातारा तालुक्यातील गटांमधून 43 व गणांमधून 62, खंडाळा तालुक्यात गटातून 26 व गणातून 31, कोरेगाव तालुक्यात गट व गणामधून 61, महाबळेश्वर तालुक्यात गटातून 7 व गणातून 10, वाईमध्ये गटातून 17 व गणातून 23, पाटणमध्ये गटात 63 व गणातून 89, फलटणमध्ये गटातून 64 व गणातून 110, माणमध्ये गटातून 16 व गणातून 44, खटाव तालुक्यातील गटातून 21 व गणांमधून 44 आणि जावली तालुक्यातील गटातून 15 व गणातून 33 जणांनी मैदानातून पळ काढला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी उलट्या -सुलट्या युत्या झाल्या आहेत. भाजपने स्वबळाचा नारा दिला असून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. फलटणमध्ये शिवसेनेने (रामराजे गट) सर्वच ठिकाणी उमेदवार उभे केले असून भाजपने राष्ट्रवादीला मोजक्या जागा सोडून युती केली आहे. वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर भाजपशी दोन हात करायला सरसावला. सातारा, कोरेगाव, कराड उत्तर आणि कराड दक्षिण, खटाव, माण, तालुक्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. जावली तालुक्यात राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा शिवसेना शिंदे गटासोबत गेला आहे. पाटण तालुक्यात मंद्रूळकोळे, काळगाव हे दोन गण वगळता राष्ट्रवादीने कुठेही उमेदवार उभा केलेला नाही. पाटणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, उमेदवारांच्या माघारीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. बहुतांश ठिकाणी तिरंगी आणि काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत. मुख्य लढती भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांच्या उमेदवारांमध्येच होणार असल्याचे चित्र आता समोर आले आहे. भाजपने फलटण तालुक्यातील विडणी गट, गुणवरे गट, साखरवाडी गण, गुणवरे गण, सांगवी गण, आसू गण राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडला आहे. त्यासोबत कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन गट, सातारारोड गट, सातारारोड गण, किन्हई गण, कुमठे गट, कुमठे गण, ल्हासुर्णे गण, एकंबे गट, एकंबे गण या जागा शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांना सोडल्या आहेत.
जिल्ह्यातील उर्वरित गट व गणांमध्ये भाजपने राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांना अंगावर घेतले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कराड, कोरेगाव, सातारा या सहा तालुक्यांमध्ये गट्टी जमली असून या सर्वच ठिकाणी दोन्ही गटातर्फे प्रत्येकी एक उमेदवार दिलेला आहे. सातारा तालुक्यातील वर्णे गटामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेण्याचे राजकारण राष्ट्रवादीने खेळले आहे. फलटणमध्ये शिवसेना (शिंदे गट व रामराजे गट) यांची भाजपशी थेट कुस्ती रंगणार आहे.
हे मातब्बर रिंगणात
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, माजी सभापती सोनाली पोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप, राजूभैय्या भोसले, माजी सभापती संदीप मांडवे, सुरेंद्र गुदगे, मनोज देशमुख, राजेश्वर दयानंद भोसले, आकाश सोळस्कर, ऋतुजा विराज शिंदे, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप बाबर, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, विक्रांत डोंगरे, संजय गायकवाड, कामेश कांबळे, माजी सभापती देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, उदयसिंह पाटील उंडाळकर, सह्याद्री कदम, जयकुमार शिंदे, सारिका धैर्यशील अनपट, अरुण गोरे, भारती गोरे, संदीप शिंदे, संदीप पवार, वसंतराव मानकुमरे, सौ. जयश्री गिरी, ऋषीकेश धायगुडे-पाटील, सोनल गोरे, डॉ. भारती पोळ, डॉ. प्रियाताई शिंदे, तेजस्विनी विक्रमशील कदम, स्वप्निल अशोक गायकवाड, दीप्ती शशिकांत पिसाळ, सौरभ शिंदे, अर्चना रांजणे, राहुल शिंदे, सर्जेराव सावंत, मधुताई कांबळे, राजेश पवार, प्राची नरेंद्र पाटील, नितीन हिंदुराव पाटील, अभिजित हिंदुराव पाटील, प्राजक्ता भरत पाटील, कविता कचरे, सागर शिवदास, राजेंद्र लवंगारे आदी मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.