लोणंद : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्याने खंडाळा तालुक्यात राजकीय धुमशान होणार आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत स्ट्राँग असलेला राष्ट्रवादी यावेळीही त्याच ताकतीने राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणून लढण्यास सज्ज झाला आहे. तर बऱ्याच राजकीय उलथापालथीनंतर पारंपारिक शत्रू असलेली काँग्रेस शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे.
गतवेळी दुबळी असलेली भाजपा आता राष्ट्रवादीचा प्रमुख विरोधक पक्ष झाला आहे. त्यामुळे खरी लढत राष्ट्रवादी व भाजपा मध्येच होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गट व शिवसेना उबाठा गट उमेदवार उभे करून आपली ताकत दाखवणार का? याची उत्सुकता आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट काय करणार, हे पहावे लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीनेही निवडणुका ताकतीने लढवण्याचे जाहीर केल्याने यावेळची निवडणूक तिरंगी, चौरंगी होण्याची चिन्हे आहेत.
एकीकडे खंडाळा तालुक्यात कागदावर स्ट्राँग असलेली राष्ट्रवादी गतवेळी प्रमाणे यावेळीही बंडाळीच्या उंबरठ्यावर आहे. काही गटात राष्ट्रवादीतील बंडाळीचा राजकीय फायदा घेण्यासाठी भाजप टपून आहे. खंडाळा तालुका हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात आला आहे. या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत दोन गटांत सामना व्हायचा परंतु राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तालुक्यातील काँगेस काहीशी दुबळी झाली. परंतु, गावागावातील कडव्या काँग्रेस कार्यकर्त्यामुळे कॉग्रेस जिवंत राहिली होती. परंतु, गेल्या नऊ वर्षात पुलाखालून बरेच पाणी जाऊन कॉग्रेसची पुरती वाताहात झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्यासह बहुतांश नेत्यांनी काँग्रेसच्या हाताला रामराम करत भाजपाचे कमळ हाती घेतले होते. त्यामुळेच या निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रमुख राजकीय विरोधक भाजपा झाला आहे.
14 वर्षापूर्वी म्हणजे 2012 च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या तीन पैकी दोन जागा काँग्रेसकडे तर एक जागा राष्ट्रवादीकडे आणि पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागा राष्ट्रवादी, दोन जागा काँगेस, एक जागा शिवसेनेला मिळाली होती. त्यानंतर 2017 साली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी 2, राष्ट्रवादीचा अपक्ष 1 अशा तीनही जागा जिंकल्या होत्या. तर पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागा राष्ट्रवादी, एक कॉग्रेस , दोन अपक्ष असे बलाबल झाले होते. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी नेहमीच स्ट्राँग राजकीय पक्ष असल्याचे चित्र राहिले आहे.
तालुक्यातील गट व गणांचा विचार केल्यास खेड बुद्रुक, भादे व शिरवळ या तिन्ही गटातील राजकीय समिकरणे या निवडणुकीत बदलण्याची चिन्हे आहेत. तसे पाहयला गेले तर राष्ट्रवादीसह सर्वच पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे उमेदवारी देताना नेत्यांची कसोटी लागणार आहे. काही गट व गणात आरक्षण सर्वसाधारण झाल्याने आम्ही कधी लढायचे आता नाही तर कधी नाही अशी परिस्थिती झाल्याने गावागावात इच्छुक उमेदवार निर्माण झाले आहेत. त्यामुळे आम्हाला बी लढायचे आहे, अशी आरोळी नेत्यांपुढे दिली जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते ना. मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये कोणाला तरी एकालाच उमेदवारी देऊ शकणार आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्रित राहून त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. इच्छुकांची वाढलेली संख्या मकरंद आबांची डोकेदुखी ठरणार आहे. त्यांना थांबवण्यात कसे यश येणार यावरच पुढची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे कागदावर स्ट्राँग असलेल्या राष्ट्रवादीत गतवेळीप्रमाणे यावेळीही सर्व काही अलबेल आहे अशी परिस्थिती मुळीच नाही आणि हीच परिस्थिती राष्ट्रवादीसाठी सत्तेच्या सारीपाटात धोकादायक ठरणार आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजप राजकीय डाव टाकणार आहे. राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी सुरू असलेली जोरदार रस्सीखेच बंडाळीच्या वाटेवर जाऊन थांबणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.
भाजपाला ना. जयकुमार गोरे यांच्या रूपाने नवा नेता मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ते व नेते चार्ज झाले आहेत. गत वेळच्या निवडणुकीमध्ये दुबळी असलेली भाजपा यावेळी स्ट्राँग झाली आहे. तिन्ही जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सक्षम व तगडे उमेदवार देण्याची तयारी भाजप कडून सुरू आहे. राज्यातील महायुतीतील प्रमुख घटक राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना शिंदे गट एकमेकांच्या विरोधात उभे राहण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उबाठा हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार की एकत्रित ताकत लावून सामना करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. वंचित बहुजन आघाडी आपले किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.