Satara ZP  Pudhari Photo
सातारा

Satara ZP Elections: सातारा तालुक्यात 72 उमेदवारांचा शड्डू

दुरंगी, चौरंगी व पंचरंगी लढती : निवडणूक रिंगणातून 105 जणांची माघार

पुढारी वृत्तसेवा
प्रविण शिंगटे

सातारा: सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 गटांतून 43 जणांनी माघार घेतल्याने 26 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. पंचायत समितीच्या 16 गणातून 62 जणांनी माघार घेतली असून 46 उमदेवार आखाड्यात राहिले आहेत. अशा एकूण 72 उमेदवारांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. बहुसंख्य ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत. भाजपच्या विरोधात महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांनी आखाड्यात उडी घेतली आहे. तालुक्यात 18 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 गट व पंचायत समितीच्या 16 गणांसाठी मंगळवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अशिष बारकूल, तहसिलदार समीर यादव व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. निवडणुकीतून माघार घेणाऱ्या उमेदवारांचा सुरूवातीला अल्प प्रतिसाद होता. बहुतांश जणांची मनधरणी सुरू होती. ‌‘अपेक्षित‌’ बोलणी झाल्यानंतर संबंधित उमेदवार अर्ज काढून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर जात होते. शेवटच्या एका तासामध्ये मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज काढून घेण्यात आले. काही ठिकाणी बोलणी झाल्यानंतर नेत्यानी ठोकलेल्या खुट्या काढून घेण्यात आल्या. बरेच उमेदवार गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आऊट ऑफ कव्हरेज होते त्यामुळे नेत्यांची कोंडी झाली. अनेकांना नाईलाजाने उमेदवारी काढून घ्यावी लागल्याने नाराजी पत्कारावी लागली.

सातारा तालुक्यात खेड, पाटखळ, कोडोली, शेंद्रे, वर्णे या गटात काँटे की टक्कर असल्याचे माघारीनंतर स्पष्ट झाले. कारी गटात ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक राजूभैय्या भोसले व शिवसेना उबाठाचे सचिन मोहिते व शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश कदम यांच्या तिरंगी लढत होत आहे. भाजपाचे या गटावर चांगले वर्चस्व आहे. त्यातच राजुभैय्या यांनी आखाड्यात उडी घेतल्याने हा गट चर्चेत आला आहे. राजूभैय्यांची वाट सुकर समजली जात असली तरी तिरंगी लढतीमुळे रंगत आली आहे.

नागठाणे गटात चौरंगी लढत होत असून भाजपासमोर राष्ट्रवादी व शिवसेनेचे आव्हान आहे. या गटात ना. शिवेंद्रराजेंनी अजिंक्यतारा सूतगिरणीचे संचालक अजित साळुंखे यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे दत्तात्रय ढाणे, शिवसेनेचे अजितकुमार जाधव व अपक्ष नंदू नलवडे रिंगणात आहेत. हा गटही भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथील लढत लक्षवेधक होणार आहे.

खेड गटात राष्ट्रवादीचे कामेश कांबळे व भाजपाचे संदीप शिंदे यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. येथे वंचित बहुजन आघाडीचे अमोल गंगावणे, रिपब्लिकन सेनेचे स्वप्नील हराळ हेही नशिब आजमावत आहेत. कामेश कांबळे यांनी भाजपामधून राष्ट्रवादीत येवून तिकिट मिळवले. त्यामुळे या लढतीकडे साताऱ्याचे लक्ष आहे. या गटात चौंरगी लढत होणार आहे. कोडोली गटातही जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे (राष्ट्रवादी), भाजपाच्या निता खरात व अपक्ष संगीता माने यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या गटावर स्व. रवी साळुंखे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथील लढतीकडे लक्ष लागले आहे.

पाटखळ गटातही तिरंगी लढत होत असून भाजपाच्या गौरी नलवडे, राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव व अपक्ष गितांजली कदम यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. सौ. कदम या खा. उदयनराजे समर्थक समजल्या जातात. त्यांच्या अपक्ष उमेदवारीने लढत रंगतदार झाली आहे. लिंब गटात ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत व राष्ट्रवादीचे राजेंद्र लावघंरे व रिपब्लिकन सेनेचे विशाल भोसले यांच्यात तिरंगी लढत होत आहे. शेंद्रे गटात भाजपाच्या पूजा मोरे व शिवसेनेच्या उर्मिला पडवळ यांच्याात दुरंगी लढत होत आहे. वर्णे गटातही बहुरंगी लढत होत असून भाजपाचे वैभव चव्हाण यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

पंचायत समिती गणामध्ये शिवथर, पाटखळ, कोंडवे, निनाम व वर्णे या गणात दुरंगी लढती होत असल्या तरी राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेनेमध्येच टक्कर होत आहे. पाटखळ गणात भाजपचे राहुल शिंदे व शिवसेनेचे हणमंत सोनटक्के यांच्यात सरळ लढत होत आहे. राहुल शिंदे यांनी यापूर्वीही या गणाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यामुळे गणातील गावागावात त्यांचे नेटवर्क असून ही लढत चर्चेत आली आहे. लिंब गणात माजी उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे रंगत निर्माण झाली आहे. येथे भाजपाकडून प्रभाकर पवार, स्व. सोपानराव पाटील यांचे नातू अपक्ष सचिन पाटील यांच्यात तिरंगी सामना रंगणात आहे.

कोंडवे गणात भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश गाडे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लावंघरे यांच्यात सरळ लढत होत आहे. खेड गणातून भाजपच्या मधु कांबळे, राष्ट्रवादीच्या कोमल गायकवाड व वंचित आघाडीच्या महानंदा जाधव नशीब आजमावत आहेत. कोडोली गणात भाजपाचे रामदास साळुंखे, राष्ट्रवादीचे राहुल कापले व अपक्ष प्रमोद जाधव यांच्यात तिरंगी लढत होत आहे. संभाजीनगर गणात भाजपाचे विजया साळुंखे, राष्ट्रवादीचे निलम पवार, अपक्ष मिनल जाधव यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

दरम्यान, क्षेत्रमाहुली, शेंद्रे, अतित या गणातही तिरंगी लढती होत आहेत. या लढती शिवसेना, भाजपा, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षामध्ये होणार आहेत. तर परळी, कारी, अपशिंगे व नागठाणे गणात बहुरंगी लढती होत आहेत. याठिकाणी भाजपाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गट, वंचित बहूजन आघाडी, शिवसेना उबाठा ,शिवसेना शिंदे गटात लढती होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT