सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. असे असले तरी अद्यापही राजकीय चित्र स्पष्ट झाले नसून, सोमवारी बैठकांचे सत्र होऊन चर्चेचे गुऱ्हाळ कायम राहिले. भाजप विरोधात आघाडी करण्याच्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यादृष्टीने आघाडी करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ना. मकरंद पाटील व माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्याशी स्वतंत्र बैठका घेऊन खलबते केली. या बैठकांचा उत्तरार्ध आज मंगळवारी पुढे सुरू राहणार आहे. दरम्यान, युती व आघाड्यांचे चित्र अस्पष्ट राहिल्यामुळे उमेदवारीचा सस्पेन्स वाढला असून, सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक गॅसवर आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापले असले तरी जिल्ह्यात आघाड्या व युती याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप मित्रपक्षांना डावलत असल्याचा आरोप करत शिवसेना, राष्ट्रवादीने व्यूहरचना आखल्याचे दिसून येत आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व इतरही पक्षांना समाविष्ट करून घेण्याच्या मानसिकतेत हे नेते आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशीही संपर्क साधला जाणार असल्याचे समजते. सोमवारी पालकमंत्री शंभूराज देसाई व विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्यामध्ये साताऱ्यात निवडणुकीच्या अनुषंगाने व्यूहरचनेची राजकीय खलबते झाली. हे दोन्ही नेते आता ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत असून, दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मंगळवारी बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे.
जिल्ह्यावर राजकीय कब्जा मिळवण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांच्या नेत्यांनी बाह्या मागे सरसावल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्येही भाजपने घटक पक्षांना सोबत घेतले नसल्याने राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांमध्ये चुळबुळ झाली. त्यातूनच नवीन राजकीय समीकरण निर्माण होवू लागले आहे. त्यामुळे भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीच्या व्यूहरचनेबाबत चर्चा सुरु केलेली आहे. सोमवारी रामराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. या बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले आणि जयवंत शेलार हे तिघेही उपस्थित होते. रामराजे आता शिवसेनेत असल्याने फलटण तालुक्यात जागा वाटप करताना शिवसेनेला झुकते माप देण्यावर या बैठकीत चर्चा झाली. पाटण आणि फलटण या दोन्ही तालुक्यांमध्ये जागा वाटप करताना शिवसेना आपला वरचष्मा ठेवेल, अशी यावेळी चर्चा झाली.
दरम्यान, यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ना. मकरंद पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी देखील चर्चा केली. त्यांच्यासमोर रामराजेंसोबतच्या बैठकीतील तपशील मांडण्यात आला. कराड उत्तर मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व असल्याने आघाडी करताना कराड उत्तरच्या जागा राष्ट्रवादीला सोडण्यावर भर राहावा, असे मत पाटील यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. आता पुन्हा मंगळवारी राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेना पक्षनेत्यांची एकत्रित बैठक साताऱ्यात होणार आहे. या बैठकीमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याची नेमकी व्यूहरचना व जागा वाटपाचा फॉर्म्युला याविषयी चर्चा होवून अंतिम निर्णय होणार आहे.