सातारा

Satara ZP Election : भाजप 27 , राष्ट्रवादी 20, शिवसेना 15

सातारा-जावलीत शिवेंद्रराजेंचे वर्चस्व, पण गडाला धक्के

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत सर्वाधिक 27 जागा जिंकत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला असला तरी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. 65 संख्याबळ असलेल्या सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणूक पूर्व युती केल्याने 20 जागा मिळवणारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि 15 जागा मिळवणारी शिवसेना यांची काँग्रेस व अपक्षांना (3) मदतीला घेत सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू झाली आहे.

महायुती न करता स्वबळावर लढत भाजपला एकहाती सातारा जिल्हा परिषदेची सत्ता देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वप्न भंगले असून राष्ट्रवादीचे नेते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील व शिवसेनेचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर यांनी भाजपचा वारू रोखला आहे. दरम्यान, भाजपचेही शिवसेनेतील एक गट फोडून सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात साताऱ्याविषयी उत्सुकता आहे.

पंचायत समित्यांवरील पक्षीय वर्चस्व

भाजपने सातारा, खटाव, कराड तर राष्ट्रवादीने खंडाळा, कोरेगाव, वाई तर शिवसेनेने पाटण पंचायत समितींमध्ये निर्विवाद सत्ता पटकावली आहे. महाबळेश्वर, जावली, माण आणि फलटण पंचायत समितींमध्ये सत्तेचे त्रांगडे झाले आहे.

वाईत राष्ट्रवादीची मुसंडी

वाईमध्ये राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. यशवंतनगर, बावधन, ओझर्डे या तीन गटांवर राष्ट्रवादीने मांड ठोकली. तर अभेपुरी, केंजळ, पाचवड, शेंदूरजणे, ओझर्डे या पाच गणांवर राष्ट्रवादीने विजय मिळवत पंचायत समितीची सत्ता पटकावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT