Satara ZP Election 
सातारा

Satara ZP Election Results : दोन्ही राजेंच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीचा सुरूंग

खेड, वर्णे, पाटखळ गटात भाजपचा दारूण पराभव : 5 गट व 10 गणात ‌‘कमळ‌’

पुढारी वृत्तसेवा

सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना.शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे यांच्या एकहाती वर्चस्वाला सातारा तालुक्यात राष्ट्रवादीने सुरूंग लावला. दोन्ही राजेंसह आ. महेश शिंदे, आ. मनोज घोरपडे यांची ताकद एकवटली असतानाही राष्ट्रवादीने त्यांना चपराक दिली. झेडपीचे 5 गट भाजपाने जिंकले असले तरी वर्णे, पाटखळ, खेड या तीन गटात त्यांचा दारूण पराभव झाला. वर्णे गटात राष्ट्रवादी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेळके यांनी आ. मनोज घोरपडे यांच्या होमपिचवर बाजी मारली. पंचायत समितीवरील सत्ता राखण्यात दोन्ही राजेंना यश आले असून 10 गणांमध्ये कमळ फुलले. मात्र,पाच गणात राष्ट्रवादी तर एका ठिकाणी शिवसेनेने विजयश्री खेचून आणली. दरम्यान, हा निकाल दोन्ही राजे व आ. मनोज घोरपडे, आ. महेश शिंदे यांच्यासाठी विचार करायला लावणारा असून तालुक्यातील राजकीय समीकरणांना छेद देणारा ठरला आहे.

सातारा तालुक्यात जि.प. 8 गट व पंचायत समितीच्या 16 गणांची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अशिष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार समीर यादव व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी 10 वाजता सुरू झाली.आतापर्यंत तालुक्यावर ना. शिवेंद्रराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले यांचेच वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीत तर दोन्ही राजेंचे मनोमीलन होवून त्यांना आ. महेश शिंदे, आ. मनोजदादा घोरपडे यांची साथ लाभली होती. या सर्वांनी एकत्रीतपणे उमेदवार दिल्याने तालुक्यावर भाजपच कब्जा करणार असे आडाखे बांधले जात होते. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या निकालाने नवी राजकीय समीकरणे अस्तित्वात येण्याची चिन्हे निर्माण झाली.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिलाच निकाल भाजपाच्या विरोधात गेला. त्यानंतर ठराविक टप्प्याने राष्ट्रवादीने अधूनमधून धक्के दिले. पाटखळ गटाचा पहिला निकाल जाहीर झाला. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव यांनी जोरदार मुसंडी मारली. हा निकाल भाजपासाठी धक्कादायक ठरला. येथे तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार शुभांगी जाधव यांनी भाजपाच्या डॉ. गौरी नलवडे यांचा 287 मतांनी पराभव केला. शुभांगी जाधव यांना 11 हजार 724, गौरी नलवडे यांना 11 हजार 437 व अपक्ष गितांजली कदम यांना 1 हजार 694 मते मिळाली. खा.श्री. छ.उदयनराजे भोसले, ना.शिवेंद्रराजे भोसले, आ.महेश शिंदे एकत्र असूनही पाटखळ जिल्हा परिषद गटात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. गितांजली कदम यांची उमेदवारी गौरी नलावडे यांच्यासाठी मारक ठरली. हा अजितदादांच्या नेतृत्वाचा आणि सातारा जिल्ह्यात असलेल्या कामांचा करिष्मा ठरला. पाटखळ गणात भाजपाचे राहूल शिंदे व शिवसेनेचे हणमंत सोनटक्के यांच्यात दुरंगी लढत झाली. राहूल शिंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार हणमंत सोनटक्के यांचा 2 हजार 783 मतांनी पराभव केला. राहूल शिंदे यांना 7 हजार 141 मते तर हणमंत सोनटक्के यांना 4 हजार 358 मते मिळाली. शिवथर गणात राष्ट्रवादीचे राजेश पवार यांनी 376 मतांनी भाजपाच्या किशोर शिंदे यांचा पराभव केला. राजेश पवार यांना 6 हजार 735 तर किशोर शिंदे यांना 6 हजार 357 मते मिळाली.

लिंब गटात भाजपाचे सर्जेराव सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लावंघरे यांचा 8 हजार 825 मतांनी पराभव केला. सर्जेराव सावंत यांना 16 हजार 178 तर राजेंद्र लावंघरे यांना 7 हजार 353 तर रिपब्लिकन सेनेचे विशाल भोसले यांना 395 मते मिळाली. लिंब गणात सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत व भाजपाचे प्रभाकर पवार यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढत झाली.या गणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. ना. शिवेंद्रराजे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी जितेंद्र सावंत यांना सांगूनही त्यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. त्यामुळे प्रचार काळात शिवेंद्रराजेंनी जितेंद्र सावंत यांचा पराभव करण्यासाठी आवाहन केले होते. त्यामुळे येथील निकालाकडे लक्ष लागले होते. भाजपाचे प्रभाकर पवार यांनी जितेंद्र सावंत यांचा 1 हजार 970 मतांनी पराभव केला. प्रभाकर पवार यांना 7 हजार 441 तर जितेंद्र सावंत यांना 5 हजार 471 तर सचिन पाटील यांना 218 मते मिळाली. कोंडवे गणात भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश गाडे यांनी अपक्ष राजेंद्र लावंघरे यांचा 6 हजार 210 मतांनी पराभव केला. महेश गाडे यांना 8 हजार 440 तर राजेंद्र लावंघरे यांना 2 हजार 230 मते मिळाली.

वर्णे गटातील निकालाकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या. एक तर हा गट आ. मनोज घोरपडे यांचे होमपिच समजला जातो तर दुसरीकडे राष्ट्रवादी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी येथून उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे नक्की बाजी कोण मारणार? याची प्रचंड उत्कंठा होती. राजू शेळके यांनी प्रचारादरम्यान या गटात जोरदार रान उठवले होते. त्यातच भाजपाने येथे वैभव चव्हाण यांना मैदानात उतरवले होते. त्याचा फटका भाजपला बसल्याचे दिसून आले. राजू शेळके यांनी वैभव चव्हाण यांचा पराभव केला. त्यांनी पध्दतशीरपणे राबविलेली प्रचार यंत्रणा, गेल्या 10 वर्षात शेतकरी व सर्वसामान्यांसाठी केलेले काम, प्रचंड लोकसंपर्क याचा त्यांना फायदा झाला. शेळके यांनी वैभव चव्हाण यांचा 568 मतांनी पराभव केला. राजू शेळके यांना 12 हजार 225 तर वैभव चव्हाण यांना 11 हजार 657 रासपचे वैभव गवळी यांना 366 तर अपक्ष संजय घोरपडे यांना 1 हजार 283 मते मिळाली.

अपशिंगे गणात झालेल्या चौरंगी लढतीत भाजपाचे मानसिंग मोरे यांनी राष्ट्रवादीचे विशाल कांबळे यांचा 2 हजार 513 मतांनी पराभव केला. मानसेिग मोरे यांना 7 हजार 287 मते तर विशाल कांबळे यांना 4 हजार 774, वंचित बहुजनचे आबा न्यायनीत 295 व अपक्ष उध्दव मोहिते यांना 1 हजार 53 मते मिळाली. भाजपाचे आ. मनोज घोरपडे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वर्णे गणात झालेल्या दुरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या स्वप्नाली फडतरे यांनी भाजपाच्या साक्षी माने यांचा 1 हजार 165 मतांनी धक्कादायक पराभव केला. स्वप्नाली फडतरे यांना 6 हजार 545 तर साक्षी माने यांना 5 हजार 380 मते मिळाली. आ. मनोज घोरपडे यांना हा निकाल विचार करायला लावणारा आहे.

खेड गटात चौरंगी व प्रतिष्ठेची लढत झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे कामेश कांबळे यांनी भाजपाचे संदीप शिंदे यांचा 5 हजार 989 मतांनी पराभव केला. कामेश कांबळे यांना 13 हजार 39 मते, संदीप शिंदे यांना 7 हजार 50, वंचित बहूजन आघाडीचे अमोल गंगावणे यांना 114 तर रिपब्लिकन सेनेचे स्वप्निल हराळ यांना 76 मते मिळाली. प्रचारादरम्यान कामेश कांबळे व संदीप शिंदे यांच्यात जोरदार टस्सल झाली होती. कृष्णानगर मतदान केंद्रावर तर दोन्ही गटात हमरीतुमरी, वादावादी झाली होती. मात्र, कामेश कांबळे यांनी भाजपच्या ताब्यातून हा गट हिसकावून घेत बाजी मारली. राष्ट्रवादीसाठी हा निकाल दिलासादायक ठरला. या निकालासाठी कामेश कांबळे यांना राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे, मिलिंददादा पाटील यांचा ग्रुप, मकरंदआबा पाटील यांचे चिरंजीव आहान पाटील यांची मदत लाभली. खेड गणात झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या कोमल गायकवाड यांनी भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या मधू कांबळे यांचा 2 हजार 6 मतांनी पराभव केला. कोमल गायकवाड यांना 5 हजार 505 तर मधू कांबळे यांना 3 हजार 499 तर वंचित बहूजन आघाडीच्या महानंदा जाधव यांना 204 मते मिळाली. क्षेत्रमाहूली गणाने राष्ट्रवादीच्या पारड्यात आपला कौल टाकला. येथे झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या राणी पवार यांनी प्रतिस्पर्धी भाजपाच्या स्वाती जाधव यांचा 744 मतांनी पराभव केला. राणी पवार यांना 5 हजार 510 तर स्वाती जाधव यांना 4 हजार 766 तर अपक्ष पुष्पा कोळपे यांना 667 मते मिळाली.

कोडोली गटातील लढत अत्यंत चुरशीची झाली होती. भाजप व राष्ट्रवादीने या ठिकाणी आपली ताकद पणाला लावली होती. मात्र, या ठिकाणी भाजपचा भगवा फडकला. या गटावरील वर्चस्व राजेंनी कायम ठेवले. स्व. रवी साळुंखे यांच्या निधनानंतर हा गट नक्की कोणाची पाठराखण करणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, या गटाने राजेंची विचारधारा कायम राखत स्व. रवी साळुंखे यांना अनोखी आदरांजली वाहिली. येेथे झालेल्या तिरंगी लढतीत भाजपाच्या निता बाळासाहेब खरात यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांचा 2 हजार 457 मतांनी पराभव केला. निता खरात यांना 7 हजार 430 कांचन साळुंखे यांना 4 हजार 973 तर अपक्ष संगीता माने यांना 4 हजार 146 मते मिळाली.

कोडोली गणात झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे राहूल कापले यांनी भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार रामदास साळुंखे यांचा 335 मतांनी धक्कादायक पराभव केला. राहूल कापले यांना 3 हजार 307 तर रामदास साळुंखे यांना 2 हजार 972 अपक्ष प्रमोद जाधव यांना 1 हजार 983 मते मिळाली. संभाजीनगर गणात झालेल्या तिरंगी लढतीत भाजपाच्या विजया सागर साळुंखे यांनी राष्ट्रवादीच्या निलम पवार यांचा 2 हजार 891 मतांनी पराभव केला. विजया साळुंखे यांना 5 हजार 220 तर निलम पवार यांना 2 हजार 329 तर अपक्ष मिनल जाधव यांना 684 मते मिळाली.

कारी गटात झालेल्या तिरंगी लढतीत ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व परळी खोऱ्याचे नेते भाजपाचे राजूभैय्या भोसले यांनी शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिपक कदम यांचा तब्बल 13 हजार 570 या विक्रमी मताधिक्क्याने विजय मिळवला. राजूभैय्या भोसले यांना 16 हजार 510 मते, दिपक कदम यांना 2 हजार 940 मते मिळाली. शिवसेना उबाठा गटाचे सचिन मोहिते यांना 1 हजार 740 मतांवर समाधान मानावे लागले. राजूभैय्या यांनी या गटावर ठेवलेले वर्चस्व, ना. शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून उभा केलेला विकासाचा झंझावात याबाबींनी राजूभैय्या यांच्या विक्रमी विजयाची पायाभरणी केल्याचे दिसून आले. राजूभैय्या यांचा विजय त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी उर्जा देणारा ठरला आहे. परळी गणात झालेल्या चौरंगी लढतीत भाजपाचे वसंतराव भंडारे यांनी शिवसेनेचे सचिन देशमुख यांचा 5 हजार 413 मतांनी पराभव केला. वसंतराव भंडारे यांना 7 हजार 453 मते, सचिन देशमुख यांना 2 हजार 40 शिवसेना ठाकरे गटाचे सागर रायते यांना 423, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्याधर निकम यांना 332 मते मिळाली.

कारी गणातील लढतीमध्ये भाजपाच्या शोभा लोटेकर यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या कांचन जाधव यांचा 6 हजार 135 मतांनी पराभव केला. शोभा लोटेकर यांना 7 हजार 774 तर कांचन जाधव यांना1हजार 639 शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार सुनंदा महामुलकर यांना 979 तर सुनिता कदम यांना 418 मते मिळाली. शेद्रे गटात झालेल्या दुरंगी लढतीत भाजपाच्या पूजा मोरे यांनी शिवसेनेच्या उर्मिला पडवळ यांचा धक्कादायक पराभव केला. ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अमर मोरे यांच्या पुजा मोरे या भावजय असून त्यांचा विजय भाजपासाठी महत्वाचा समजला जात आहे. मोरे यांच्यासाठी बाजार समिती चेअरमन विक्रम पवार यांनीही जोरदार फिल्डिंग लावली होती. पूजा मोरे यांनी उर्मिला पडवळ यांचा 6 हजार 305 मतांनी यांचा पराभव केला. पूजा मोरे यांना 13 हजार 654 मते तर उर्मिला पडवळ यांना 7 हजार 349 मते मिळाली.

निनाम गणात झालेल्या दुरंगी लढतीत भाजपाच्या प्रमिला सुतार यांनी शिवसेनेच्या नलिनी पवार यांचा 3 हजार 120 मतांनी पराभव केला. प्रमिला सुतार यांना 6 हजार 980 तर प्रमिला सुतार यांना 3 हजार 860 मते मिळाली. शेंद्रे गणात झालेल्या दुरंगी लढतीत भाजपाच्या कोमल दळवी यांनी शिवसेनेच्या मनिषा भोसले यांचा 2 हजार 994 मतांंनी पराभव केला. कोमल दळवी यांना 6 हजार 524 तर मनिषा भोसले यांना 3 हजार 530मते मिळाली. नागठाणे गटात झालेल्या चौरंगी लढतीत ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक भाजपाचे अजित साळुंखे (सर) यांनी जोरदार विजयश्री खेचून आणली. प्रचारादरम्यान त्यांना अपक्ष नंदू नलावडे यांनी आव्हान दिले होते. प्रत्यक्षात निकाल बाहेर आला तेव्हा अजित साळुंखे यांनी भाजपचा झेंडा येथे फडकवला. त्यांनी नलावडे यांचा 305 मतांनी पराभव केला. अजित साळुंखे यांना 7 हजार 338, शिवसेनेचे अजितकुमार जाधव यांना 5 हजार 426 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दत्तात्रय ढाणे यांना 441 व अपक्ष नंदू नलावडे यांना 7 हजार 33 मते मिळाली.

नागठाणे गणात झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेनेच्या संतोष साळुंखे यांनी भाजपाचे राजेंद्र ढाणे यांचा 2 हजार 537 मतांनी पराभव केला. संतोष साळुंखे यांना 6 हजार 319, राजेंद्र ढाणे यांना 3 हजार 782, राष्ट्रवादीचे सुखदेव पवार यांना 683, अपक्ष दत्तात्रय ढाणे यांना 164 मते मिळाली. अतित गणात झालेल्या तिरंगी लढतीत भाजपाच्या सुषमा जाधव यांनी शिवसेनेच्या प्रमिला यादव यांचा 1 हजार 484 मतांनी पराभव केला. सुषमा जाधव यांना 5 हजार 143 प्रमिला यादव यांना 3 हजार 659तर शिवसेना उबाठा गटाच्या कामिनी तळेकर यांना 360 मते मिळाली. या निकालाने सातारा तालुक्यात दोन्ही राजेंना शह दिला असला तरी भाजपाने लिंब, कोडोली, कारी, शेंद्रे, नागठाणे गटात आपले वर्चस्व राखले आहे. तर गणात पाटखळ, लिंब, कोंडवे, संभाजीनगर, परळी, कारी, निनाम, शेंद्रे, अतित व अपशिंगे गणातही भाजपाने मुसंडी मारली आहे तर राष्ट्रवादीने पाटखळ,खेड व वर्णे गटावर तर शिवथर, खेड, क्षेत्रमाहूली, कोडोली, वर्णे या गणात शिरकाव केला आहे. शिवसेनेने नागठाणे गणात यश मिळवून पंचायत समितीमध्ये चंचूप्रवेश केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT