सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सातारा तालुक्यात 8 गट व 16 गणांसाठी चुरशीने 62.42 टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या झेंड्याखाली खा. उदयनराजे व ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन झालेे. त्यामुळे नगरपालिकेत जसे अभूतपूर्व यश मिळाले तसेच यश जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राजांना मिळणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सातारा तालुक्यावर पुन्हा राजेंचाच करिष्मा राहणार असल्याची चर्चा असली तरी याचा फैसला आज होणार आहे. दोन्ही राजेंसह आ. मनोज घोरपडे, आ. महेश शिंदे यांची ताकद एकवटल्याने भाजपचे पारडे जड समजले जात आहे. दरम्यान, मतमोजणी दहा वाजता सुरु होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. गट व व गणांमध्ये गलबला झाला. आठवडाभर चाललेल्या प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना यांच्यातील बहुतांश लढती लक्षवेधक ठरल्या. त्यामुळे तालुक्यात निवडणुकीत चांगलीच रंगत प्राप्त झाली होती. खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, आ.मनोज घोरपडे, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रचारसभा, पदयात्रा, कोपरासभा, मतदारांच्या भेटीगाठी यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून गेले होते.
सर्वच गट व गणांमध्ये रंगत दिसून आली. पाटखळ गटात भाजपा, राष्ट्रवादी व अपक्ष अशी तिरंगी लढत झाली असली तरी भाजपाच्या गौरी नलावडे व राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव यांच्यामध्ये जोरदार टस्सल पहावयास मिळाली. मात्र अपक्ष गितांजली कदम यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे या गटातील निकालाचेही औत्सुक्य आहे. त्याचबरोबर पाटखळ गणात झालेल्या दुरंगी लढतीत भाजपा व शिवसेना उमेदवारांमध्ये मतदानादिवशीच झालेल्या राड्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लिंब गटात तिरंगी लढत असली तरी भाजपाचे सर्जेराव सावंत व राष्ट्रवादीचे राजेंद्र लावंघरे यांच्यात चुरस पहायला मिळाली. खेड गटात भाजपा व राष्ट्रवादीमध्ये लढत झाली असली तरी ही लढत भूमीपूत्र विरूध्द उपरा उमेदवार असा प्रचार झाल्याने ही लढत लक्षवेधी ठरली.
कोडोली गटात तिरंगी लढत झाली असून भाजपा, राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवार यांच्या प्रचार काळात चांगलाच सामना रंगला. भाजपाच्या निता खरात, राष्ट्रवादीच्या कांचन साळुंखे व अपक्ष संगिता माने यांनी प्रचार काळात जोरदार रान उठवले होते. चांगली वातावरण निर्मिती झाल्याने येथील निकालही लक्षवेधक ठरणार आहे. कारी गटात भाजपाचे राजूभैय्या भोसले विरूध्द शिवसेना शिंदे गटाचे दिपक कदम व ठाकरे गटाचे सचिन मोहिते यांनी लढा दिला. या गटात दोन्ही शिवसेना उमेदवार एकमेकांविरोधात लढल्याने या मत विभागणीचा फायदा राजूभैय्या भोसले यांना होण्याची शक्यता आहे. याचबरोबर भाजपाने केलेली कामे, ना. शिवेंद्रराजे भोसले यांची झालेली सभा आणि स्वत: राजूभैय्यांचा वाडीवस्तीवरील असलेला जनसंपर्क यामुळे या गटात भाजपाचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.
शेंद्रे गटात भाजपाच्या पूजा मोरे विरूध्द उर्मिला पडवळ असा सामना रंगला. या दुरंगी लढतीकडे शेंंद्रे गटाचे लक्ष लागून राहिले आहे. वर्णे गटात भाजपाचे वैभव चव्हाण विरूध्द स्वाभिमानी पक्षाचे राजू शेळके यांच्या टफ फाईट झाली. आ. मनोजदादा घोरपडे यांचे समर्थक वैभव चव्हाण यांना तिकीट दिल्याने त्यांच्याच गटाचे संजय घोरपडे यांनी अपक्ष उमेदवारी केली. याचबरोबर भाजपा पदाधिकाऱ्याकडून अपेक्षित रान उठवण्याचा प्रयत्न केला. तसेच मतदानापूर्वी दोन दिवस अगोदर भाजपाकडून घरोघरी प्रचार करण्यात आला. याउलट राजू शेळके यांनी या गटात केलेली वातावरण निर्मिती ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेला उमेदवार आणि गत 10 वर्षात केलेल्या काम या मुद्यावर त्यांनी वातावरण ढवळून काढले. यामुळे चव्हाण विरूध्द शेळके अशी अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये बाजी कोण मारणार? हे निकालानंतरच कळणार आहे.
नागठाणे गटात भाजपाचे अजित साळुंखे विरूध्द अपक्ष नंदू नलवडे यांच्यातच झूंज रंगली. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित साळुंखे यांना मैदानात उतरवल्यानंतर साळुंखे यांनी गटाच्या विकासाच्या मुद्यावर भर देत जोरदार वातावरण तापवले. गावोगावच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्र्यत्न केला. तसेच नलवडे यांनीही प्रचार यंत्रणा जोमाने चालवली. या गटात शरद पवार गटाचे दत्तात्रय ढाणे व शिवसेना शिंदे गटाचे अजितकुमार जाधव हे किती मते घेतात? हे पहावे लागेल. दोन्ही राजेंची व आ. मनोजदादांची ताकद एकवटल्याने अजित साळुंखे सर यांचा मार्ग सुकर असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
सातारा तालुक्यात गटाप्रमाणेच पंचायत समितीच्या गणांमध्येही काटे की टक्कर पहावयास मिळाली. विशेषत: खेड गणात पोलिंग बुथवर कार्यकर्ते चिन्ह सांगत होते. कार्यकर्त्याला चिन्ह सांगू नको असा दम दिला. त्यातून दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांने तुम्हीही चिन्ह सांगू नका, असे बजावले. या तापातापीने राडा झाला. त्यामुळे या गणात कोण बाजी मारणार? याकडे नजरा लागल्या आहेत. मधू कांबळे, कोमल गायकवाड व महानंदा जाधव असा तिरंगी सामना रंगला. याचबरोबर पाटखळ गणातही जोरदार हाणामारी झाल्याने भाजपा बाजी मारणार की शिवसेना? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राहूल शिंदे व हणमंत सोनटक्के यांच्यात चुरशीची लढत झाली.
शिवथर, कोंडवे, निनाम, शेंद्रे गणात राष्ट्रवादी व भाजपामध्ये दुरंगी लढत पहावयास मिळाली. लिंब, खेड, क्षेत्रमाहुली, कोडोली, संभाजीनगर, अतित येथे तिरंगी लढती झाल्या. तर परळी, कारी, अपशिंगे, नागठाणे या गणात बहुरंगी लढती झाल्या. त्यामुळेच सर्वच उमेदवारांनी विजयाची खात्री दर्शवली असल्याने सातारा पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकणार?याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.