सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे धूमशान आजपासून खऱ्या अर्थाने रंगात येणार आहे. अर्ज दाखल करण्यास शुक्रवार (दि. 16) पासून सुरुवात होत असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार यादी जाहीर केली नसल्याने इच्छुकांमध्ये अर्ज भरण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी दि. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात होणार असली तरी राजकीय पक्षांनी मात्र आपली अंतिम उमेदवार यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या नुसताच बैठकांचा सपाटा सुरु आहे. मात्र गट व गणात अनेकांनी तयारी केली असली तरी पक्षाचा ए बी फॉर्मच त्यांची उमेदवारी निश्चित करणार आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. गटाच्या प्रमुखाकडे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भेटीगाठींचा सपाटा सुरु आहे. बंडखोरी टाळण्यासाठी यादीला विलंब लावला जात आहे. त्यामुळे इच्छुकांमधील घालमेल वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 65 गट व पंचायत समितीचे 130 गण आहेत. महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस व इतर घटक पक्षांनी निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मुलाखती घेवून उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता उमेदवारी कुणाला मिळणार? याची सर्वच पक्षाच्या इच्छुकांना उत्कंठा लागून राहिली आहे.
आजपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेद्वारे राजकीय रणधूमाळीस खऱ्या अर्थाने सुरुवात होत असून कुणाचे तिकीट कापणार? कुणाला संधी मिळणार हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरीला उधाण येणार असल्याचे चित्र आहे. दि. 16 ते 20 जानेवारी अखेर निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी आहे. दि. 16 ते 21 जानेवारी अखेर सकाळी 11 ते 3 यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करणे दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्जाची छाननी व त्यावर निर्णय देणे, दि.23, 24 व 27 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत.
दि. 25 रोजी रविवार व सोमवार दि. 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारण्यात येणार नाही. दि. 27 रोजी दुपारी 3.30 नंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप, गुरुवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान, दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे.