Satara ZP News  Pudhari File Photo
सातारा

Satara ZP Election: जिल्ह्यातील 22 लाख मतदारांचा कौल कुणाला?

65 गट, 130 गणांसाठी आज रंगणार धूमशान; 626 उमेदवार रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषद तसेच 11 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, दि. 7 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी आणि पंचायत समित्यांच्या 130 गणांसाठी एकूण 626 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत 21 लाख 94 हजार 110 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांचा निर्णायक कौल कुणाला मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद गटांच्या 65 जागांसाठी एकूण 231 उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. त्यामध्ये 135 पुरुष, तर 96 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तसेच पंचायत समित्यांच्या गणांच्या 130 जागांसाठी 395 उमेदवारांनी राजकीय नशीब आजमवायचे ठरवले आहे. गणांमध्ये 205 पुरुष आणि 190 महिला उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 626 उमेदवारांमुळे अनेक गट-गणांमध्ये बहुरंगी लढती रंगल्या. काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या लढती पहायला मिळाल्या.

या निवडणुकीत जिल्ह्यात 2 हजार 877 मतदान केंद्रे आहेत. गावोगावी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणा पूर्णत: सज्ज झाली आहे. जिल्ह्यात एकूण 21 लाख 94 हजार 110 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 10 लाख 85 हजार 847 पुरूष मतदार, 11 लाख 82 हजार 203 महिला मतदार आणि 60 इतर मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांपेक्षा लक्षणीय असल्याने अनेक ठिकाणी महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता कोणाच्या हातात जाणार, यावर पुढील पाच वर्षांच्या विकासाचा रोडमॅप ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारयंत्रणा राबवली होती. गावपातळीवर सभा, पदयात्रा, घरभेटी, सोशल मीडियाचा वापर अशा विविध माध्यमांतून प्रचार करण्यात आला. काही गटांमध्ये बंडखोरी, अपक्ष उमेदवार आणि घराणेशाही विरोधात नाराजी यामुळे लढती अधिक रंगतदार झाल्या आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. मतदान पथकांना आवश्यक मतदान साहित्याचे वाटप करून ही पथके दुपारपर्यंत संबंधित मतदान केंद्रावर पोहोचली. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रांची तपासणी करून त्यांची सज्जता करण्यात आली होती. मतदानापूर्वी मतदान यंत्रांचा मॉकपोल राजकीय प्रतिनिधींसमोर होऊन मतदान प्रक्रियेस सुरूवात होणार आहे. मतदान यंत्रांत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त यंत्र सामग्री व मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहे.

या निवडणुकीत काही गट व गणांमध्ये स्थानिक प्रश्नांवर आधारित मतदान होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा, रस्ते, शेती प्रश्न, आरोग्य सुविधा, शिक्षण, भ्रष्टाचार आणि विकासकामे हे प्रमुख मुद्दे प्रचारात पुढे आले होते. मतदार विकासाभिमुख नेतृत्वाला प्राधान्य देतील की जातीय किंवा पक्षीय समीकरणे प्रभावी ठरतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. दिवसभरात मतदानाचा टक्का ग्रामीण भागातील प्रतिसादावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याचा निकालावर प्रभाव पाडू शकतो. उमेदवारांची प्रचंड संख्या आणि त्यांना लाखोंच्या संख्येने मतदान करणारे मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जिल्ह्याचे ग्रामीण राजकारण कोणत्या दिशेला न्यायचे याचा फैसला शनिवारी होणाऱ्या मतदानातून मतदार करणार आहेत. ग्रामीण भागाच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात जाणार, हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हावासियांचे लक्ष मतदान टक्केवारीकडे आणि त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

जिल्ह्यातील हे तालुके संवेदनशील

सातारा, माण, फलटण, पाटण या तालुक्यांतील काही मतदान केंद्रे अत्यंत संवेदशील आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजकीय गोटात बऱ्याच हालचाली सुरू होत्या. या तालुक्यांतील संबंधित मतदान केंद्रांवर गोंधळ होण्याची शक्यता असल्याने यंत्रणांना विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याने जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त ठेण्यात येणार आहे. काही ठिकाणी अतिरिक्त पोलिस फौज तैनात करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भरारी पथके, स्थिर पथके आणि व्हिडिओ मॉनेटरिंग यंत्रणा कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT