भाजप, राष्ट्रवादीकडून गटनेत्यांची निवड 
सातारा

Satara Politics : भाजप, राष्ट्रवादीकडून गटनेत्यांची निवड

राजूभैया भोसले, उदय कबुले या अनुभवी सदस्यांना संधी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. भाजप व राष्ट्रवादीतर्फे गटनेत्यांची नियुक्ती करण्यात आली. कारी जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले राजूभैया भोसले यांची भाजपच्या गटनेतेपदी वर्णी लागली आहे, तर राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शिरवळ गटाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे उदय कबुले यांना गटनेतेपदी संधी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली. सातारा जिल्ह्याच्या जनतेने कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्याने सत्ता स्थापनेबाबत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. तर भाजपने सोमवारी गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली.

भाजपने जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम व जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्या उपस्थितीत सोमवारी गटनेता, उपगटनेता, पक्षप्रतोद यांच्या निवडी केल्या. जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले व दुसरी टर्म हाती घेतलेले राजूभैया भोसले यांना भाजपने जिल्हा परिषदेतील गटनेतापद दिले. तर पाल गटाचे मदन काळभोर यांची उपगटनेतेपदी निवड केली. पक्षप्रतोदपदी कातरखटाव गटातील धनंजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडींसाठी साताऱ्यात झालेल्या बैठकीला भाजपचे जिल्हा परिषदेतील 27 सदस्य उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने या निवडी झाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देखील गटनेतेपदी ना. मकरंद पाटील यांचे विश्वासू उदय कबुले यांना संधी देण्यात आली आहे. तर उपगटनेतापदी येळगाव जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची नियुक्ती केली. तर पक्षप्रतोद म्हणून कुकुडवाड गटातून निवडून आलेले व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी-शिवसेना या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु केल्या. मात्र, भाजपच्या नेतेमंडळींनीही सत्ता स्थापनेचा दावा केला असल्याने जिल्हा परिषदेत कोण-कुणाचा भिडू असणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करायची झाल्यास शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य त्यांना फोडावे लागतील, मात्र, ही बाब सध्याच्या घडीला अशक्य आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे बहुमत असतानाही सत्तास्थापनेमध्ये होत असलेली दिरंगाई ही कार्यकर्त्यांना खटकत आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसारच सातारा जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेचे समीकरण सोडवले जाणार आहे. मुंबईमध्ये मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक होणार असल्याने ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. मकरंद पाटील, ना. शंभूराज देसाई हे तिन्ही मंत्री मुंबईला गेले असून याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा होवून अंतिम निर्णय होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT