सातारा : सातारा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून गुरुवार दि. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निकाल दि. 7 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळले असून इच्छुकांनी जोरदार रणशिंग फुंकले आहे. आता गावोगावी ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. सातारा जिल्हा परिषदेचे 65 गट व पंचायत समितीच्या 130 गणात इच्छुकांमध्ये झुंज होणार आहे. भाजपा, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, रिपाइं यासह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.
सातारा जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल मार्च 2022 मध्ये संपला. त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समितीचा प्रशासक म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची पुनर्रचना केली. नवीन प्रभाग रचनेनुसार फलटण, कोरेगाव, खटाव तालुक्यात नव्याने प्रत्येकी एक गट वाढला. त्यामुळे जिल्हा परिषद गटांची संख्या 65 वर तर पंचायत समिती गणांची संख्या 130 वर पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून झेडपी निवडणुकीची प्रतिक्षा लागून राहिली होती.
निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातही राजकीय कालवाकालव सुरू झाली आहे. गट व गणामध्ये राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे. इच्छुकांनी आता नव्याने जोर बैठका काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ऐन थंडीत गट व गणातील राजकीय वातावरण तापणार आहे.
जिल्ह्याच्या शहरी भागावर भाजपने झेंडा फडकवल्यानंतर आता ग्रामीण भागावर कोण वर्चस्व गाजवणार? याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी आपापले तालुके ताब्यात ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच चांगला उमेदवार आपल्याकडे यावा, यासाठी जाळे टाकण्यात येत आहे.
अर्ज दाखल करण्यास 6 दिवस असल्याने अत्यंत कमी वेळात सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. तसेच प्रचारासाठीही कमी कालावधी मिळणार असल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांना कसरत करावी लागणार आहे. प्रचार, नियोजन व उमेदवार निवडीसाठी पक्षीयस्तरावरील बैठकांना वेग येणार आहे. दुसरीकडे इच्छुकांकडून गावोगावी पोहचण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी केली जावू लागली आहे. अगोदर शुकशुकाट असणाऱ्या पक्ष कार्यालयांमध्ये वर्दळ वाढणार आहे.