Satara ZP: झेडपीत ‌‘शिक्षण‌’चं छत कोसळलं Pudhari
सातारा

Satara ZP: झेडपीत ‌‘शिक्षण‌’चं छत कोसळलं

नवे पदाधिकारी बसण्यापूर्वीच आघात : प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात पदाधिकारी खुर्चीवर बसण्यापूर्वीच प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे छत कोसळले. त्यामुळे प्रशासनाच्या निकृष्ट कामकाजाचा नमुना समोर आला. त्यामुळे प्रशासनाचा सावळा गोंंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

सातारा जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची दालने 21 मार्च 2022 पासून बंद अवस्थेत आहेत. मात्र, महिन्यातून या दालनांची वेळच्यावेळी प्रशासनामार्फत स्वच्छता करण्यात येत होती. सध्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची लगीनघाई प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या दालनाची रंगरंगोटी व साफ सफाईसारखी कामे बांधकाम विभागामार्फत युध्दपातळीवर सुरू आहेत. गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती दालनातील प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे छत कोसळले. त्यामुळे पदाधिकारी बसण्यापूर्वीच हा मोठा आघात झाला आहे.

पीओपीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यानेच प्रशासनाच्या उत्कृष्ट कामकाजाचा नमुना समोर आला आहे. मात्र, ही घटना घडण्यापूर्वी या दालनात सभापती व नागरिक असते तर मोठा प्रसंग घडला असता. त्यामुळे प्रशासनाने सर्वच दालनांची पुन्हा तपासणी करून दालने सुसज्ज करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांमधून होत आहे.

उपाययोजना करण्याची गरज...

सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतीपदासाठी विशेष दालने आहेत. मात्र ही दालने बऱ्याच वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. या दालनामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याने दालनामध्ये केलेली प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे छत धोकादायक स्थितीत झाले होते तेच छत शिक्षण सभापतींच्या दालनात कोसळले. त्यामुळे पदाधिकारी बसण्यापूर्वीच प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असे धोकादायक स्थितीत छत आहेत का? याची प्रशासनाने पुन्हा पाहणी करून त्याची डागडूजी करणे आवश्यक आहे. तसेच भिंतीच्या बाजूने मुरत असलेल्या पाण्याचा शोध घेवून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT