Satara ZP Pudhari
सातारा

Satara ZP: पारदर्शक, गतिमान प्रशासनात झेडपीचा राज्यात डंका

उत्कृष्ट कामकाजाबद्दल सिईओंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवस कार्यालयीन सेवाविषयक बाबींमध्ये पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरता गुणांकनाबाबत 150 दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ठ कामकाज केल्याने सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात डंका वाजला आहे. त्यामुळे सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेने 150 दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2025 अखेर राबवण्यात आला होता. तथापि ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीमुळे या कार्यक्रमास 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर या कार्यक्रमाचे मूल्यमापन करून सेवा कर्मी कार्यक्रमांचे गुणांकन करण्यात आले. या गुणांकनामध्ये सातारा जिल्हा परिषदेस 80 पैकी 80 असे 100 टक्के गुण मिळाले आहेत. या सेवा कमी कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना विषयक बाबी अद्यावत करण्यात आल्या.

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या पदोन्नतीने सरळ सेवा नियुक्ती देण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या बिंदू नामावल्या प्रमाणीकरण करुन घेण्यात आल्या. जिल्हा परिषद अंतर्गत 100 टक्के अनुकंपा नियुक्ती करण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्म आयजीओटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून पोर्टल वरील 5 कोर्स पूर्ण केले. सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्यावत करण्यात आले.

या सर्व बाबींमध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट कामकाज केल्यामुळे या बाबींच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या गुणांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून सातारा जिल्हा परिषदेने सर्वोत्कृष्ट कामकाज केलेल्या जिल्हा परिषदेच्या नावांमध्ये समावेश मिळवला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि.16 फेब्रुवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे साताऱ्याचा राज्यात डंका वाजला आहे.

पुरस्कार जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. याप्रमाणे भविष्यात देखील अशा सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सातारा जिल्हा परिषद शासनामार्फत राबवणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवणार आहे.
-याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT