सातारा : देशभरात आपल्या अलौकिक कामगिरीने नावाजलेल्या सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यात अक्षरश: हमरीतुमरी होऊन हातापायी झाली. जि.प. सदस्यांना प्रचंड पोलिस बंदोबस्तात सभागृहात नेताना व गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना ताब्यात घेताना शंभूराज देसाई व पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम होऊन त्यांचे बोट रक्तबंबाळ झाले.
गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य मतदानावेळी अनुपस्थित राहिल्याने व राष्ट्रवादीच्या एका सदस्याने भाजपला मतदान केल्याने भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेचा 33 विरुद्ध 30 मतांनी पराभव करत सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच परिवर्तन घडवले.
शिवेंद्रराजे भोसले यांच्या मदतीने ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी करून दाखवत सातारा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणून दाखवली. अध्यक्षपदी शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांच्या पत्नी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. प्रिया महेश शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक राजू भोसले यांची निवड झाली. निवडीनंतर भाजपने जोरदार जल्लोष केला. तर, राष्ट्रवादी व शिवसेनेने या निवडणुकीवर आक्षेप घेत न्यायालयीन लढाईचा इरादा स्पष्ट केला.
सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1, भाजपकडे 28 असे 65 सदस्यांचे बलाबल होते. भाजपने दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे दोन, तर शिवसेनेच्या आ. महेश शिंदे गटाचे दोन सदस्य फोडले होते. त्यामुळे दिनांक 19 पर्यंत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडीकडे 33, तर भाजपकडे 32 सदस्य झाले होते. बहुमतासाठी 33 सदस्यांची आवश्यकता होती व भाजपकडे 1 सदस्य कमी होता. त्यामुळे भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ जोरदारपणे राबवण्याच्या हालचाली केल्या. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, आ. महेश शिंदे, धैर्यशील कदम हे भाजपला सत्तेवर आणण्यासाठी जोरदार हालचाली करत होते.
तर, दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील, आ. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी-शिवसेनेची आघाडी सत्तेत आणून ‘ऑपरेशन लोटस’ थोपवण्याच्या हालचालीत होते. गुढीपाडव्याच्या रात्री आ. जयकुमार गोरे यांनी आक्रमक चाली रचल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई तालुक्यातील यशवंतनगर जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले सदस्य बापूसाहेब ऊर्फ दिनकर शिंदे यांच्या अपहरणाची व खुनाचा प्रयत्न झाल्याची तक्रार त्यांचेच चिरंजीव विकास शिंदे यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा परिषदेवर गेलेले सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, वाई पंचायत समितीचे सभापती विक्रांत ऊर्फ भैया डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या चौघांचे सर्च ऑपरेशन राबवले. ते रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. सकाळीही पोलिस त्यांच्या मागावर होते.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे 33 सदस्य शंभूराज देसाई, मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी ‘हॉटेल लेक व्ह्यू’मध्ये ट्रॅव्हलमधून आणले. तर, भाजपने आपले सर्व सदस्य ‘हॉटेल फर्न’ येथे ठेवले होते. भाजपने अध्यक्षपदासाठी अचानकपणे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आ. महेश शिंदे यांच्या पत्नी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनाच अध्यक्षपदाच्या उमेदवार करून मोठी चाल रचली. तर, उपाध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक राजू भोसले यांना उमेदवार केले. भाजपने या दोघांचेही उमेदवारी अर्ज सर्वात अगोदर भरले. राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या औंध गटाच्या सदस्य मनीषा योगेश फडतरे, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे गोकुळ तर्फ हेळवाक गटाचे अशोकराव पाटील यांना उमेदवारी दिली. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
जिल्हा परिषदेबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. कोणालाही पोलिस आत सोडत नव्हते. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होणार होती. तत्पूर्वीच, भाजपचे सर्व सदस्य बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेले. तर, शासकीय विश्रामगृहावर बसून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, धैर्यशील कदम ही भाजपची नेतेमंडळी रणनीतीत व्यग्र होती. त्याचवेळी अचानकपणे जिल्हा परिषदेच्या आवारात पालकमंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील, नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व सेनेच्या सदस्यांची ट्रॅव्हल जिल्हा परिषदेच्या गेटवर आली. शंभूराज देसाई यांच्या गाडीत गुन्हा दाखल झालेले अनिल देसाई व संदीप मांडवे हे सदस्य होते.
शिवाय, कामेश कांबळे हेही शशिकांत शिंदे व मकरंद पाटील यांच्यासमवेत आले. शंभूराज देसाई यांनी अनिल देसाई व संदीप मांडवे यांना घेऊन जिल्हा परिषदेत एन्ट्री केली. त्याचवेळी कामेश कांबळे आत जात असताना शिवेंद्रराजे यांची आक्रमक एन्ट्री जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये झाली. तिथेच कामेश कांबळे यांच्यावरून तीनही मंत्र्यांमध्ये हातापायी झाली, तणातणी झाली. शिवेंद्रराजे, शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. शिवेंद्रराजे भोसले यांचे आक्रमक रूप त्यावेळी अनेकांना दिसले. या झटापटीतच अनिल देसाई व संदीप मांडवे हे सभागृहात मतदानासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शंभूराज देसाई यांच्या हे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही सदस्यांचे हात शंभूराज देसाई यांनी धरले. मात्र, पोलिसांची व शंभूराज देसाई यांची जोरदार झटापट झाली. शंभूराज देसाई यांचा हात झिडकारत पोलिसांनी दोन्ही सदस्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी शंभूराज देसाईंच्या बोटाला दुखापत झाली व ते रक्तबंबाळ झाले. तातडीने डॉक्टरांना पाचारण करून देसाई यांच्या हाताला पट्टी करण्यात आली.
सभागृहात मतदानाची प्रक्रिया सुरू होताच राष्ट्रवादीचे खेड गटाचे सदस्य कामेश कांबळे यांना भाजपच्या गोटात आणून उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजू भोसले यांच्याशेजारी बसवण्यात आले. अध्यक्षपदासाठी मतदानाची प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांनी सुरू केली. त्यानुसार डॉ. प्रिया शिंदे यांना 33, तर मनीषा फडतरे यांना 30 मते मिळाली. कामेश कांबळे यांच्या मतदानावरून काही काळ गोंधळ उडाला. उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले यांनाही 33, तर अशोकराव पाटील यांना 30 मते मिळाली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अध्यक्षपदी डॉ. प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले हे निवडून आल्याचे जाहीर केले.
निवडीनंतर भाजपने व आ. महेश शिंदे गटाने जोरदार जल्लोष केला. तर, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व प्रकाराचा निषेध केला. भाजपने लोकशाहीचा गळा घोटत निवडणूक प्रक्रिया हातात घेऊन प्रशासनाच्या मदतीने गुन्हे दाखल करून ही निवडणूक प्रक्रिया राबवली, त्याचा आम्ही निषेध करून न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई, मकरंद पाटील व आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.
सातारा जिल्हा परिषदेवर 1962 पासून 1999 पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसची, 1999 पासून 2022 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली. पहिल्यांदाच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यातून जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करत भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत परिवर्तन घडवून आणले. जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच कमळ फुलले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेत जाऊन अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे व उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांना खुर्चीवर बसवून पदभार सोपवला. भाजपच्या नेते मंडळींनी जिल्हा परिषदेत एकत्र येत एकच जल्लोष केला. भाजपने या संपूर्ण विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
मंत्री असून आम्हाला दहा पोलिसांनी ओढले : ना. शंभूराज देसाई
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी शिवसेना व राष्ट्रवादीकडे 33 सदस्यसंख्या होती. मात्र, दोन सदस्यांना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून ओढून नेले. मी पालकमंत्री व मकरंद पाटील हे मंत्री असतानाही आम्हा दोघांनाही 10 पोलिस ओढत होते. माझ्या हातातून रक्त आले. साताऱ्याचे पोलिस भाजपच्या घरगड्यासारखे वागले आहेत. भाजपने हे अत्यंत निंदनीय कृत्य केले आहे. याचे पडसाद जिल्ह्यात तीव्रपणे उमटतील. भाजपने ढोल-ताशे वाजवू दे... मात्र नैतिक विजय राष्ट्रवादी-शिवसेनेचा आहे, अशी टीका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.