Satara ZP News  Pudhari File Photo
सातारा

Satara ZP Election: झेडपी ताब्यात घेण्यासाठी नेत्यांचा खणखणाट

सांगता सभांमध्ये वॉर-प्रतिवॉर; महायुतीत शाब्दिक वितुष्ट

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेसाठी झालेल्या प्रचार सभांच्या सांगतेवेळी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात तलवारींचा खणखणाट केला. शेलक्या भाषेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत मंत्री, आमदार व खासदारांनी एकमेकांची यथेच्छ धुलाई केली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी वॉर-प्रतिवॉर शेवटच्या दिवशी जोरदार रंगले. महायुतीतले हे शाब्दिक वितुष्ट 9 तारखेच्या निकालानंतर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीपासून भाजप नेत्यांच्या रडारवर आहेत. फलटण व मेढ्यामध्ये भाजपच्या नेत्यांशी ना. देसाई यांची हमरी-तुमरी झाली होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी त्यांचा चांगलाच खटका उडाला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीत पाटणमधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना घेरले.

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पाटणमध्ये सभा घेवून ‌‘इथल्या पालकमंत्र्याला मी मालकमंत्री म्हणतो. हिंमत असेल तर गणेश नाईकांचा टांगा पलटी करुन दाखव‌’ अशा शब्दांत त्यांनी ना. शंभूराज देसाई यांना डिवचले. त्यावर ‌‘आमच्या नेत्याला असं बोललात आणि आमच्या नेत्याने परवानगी दिली तर मी तुमचा टांगा पलटी करेन‌’,

असा पलटवार ना. देसाई यांनी केला. ना. जयकुमार गोरे यांनी तर ना. देसाई यांना पाटणमध्ये जावून आव्हान दिले. ‌‘पालकमंत्री कुणीही असू दे, फरक पडत नाही. छोट्या कार्यकर्त्यांना आणून दमदाटी करणार असाल तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.‌’ हे लक्षात ठेवा. आम्ही पाटणला काही कमी पडू देणार नाही, सत्यजित पाटणकर हेच पाटणचे पालकमंत्री आहेत,असा वार ना. गोरे यांनी केल्यानंतर ना. देसाई यांनी पाटणची जनताच 9 फेब्रुवारीला ना. गोरे यांना उत्तर देईल. पालकमंत्री हे पद संविधानिक पद आहे. ते जसे सोलापूरचे पालकमंत्री आहेत, तसा मी सातारचा पालकमंत्री आहे. ग्रामविकासचा निधी कशा पध्दतीने वितरित करायचा, याचे सूत्र समन्वय समितीने ठरवले आहे. मी जर सोलापूरमध्ये जावून ना. गोरे यांच्यासारखे बोललो तर चालेल का? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जावली खोऱ्यातही या निवडणुकीच्या निमित्ताने तलवारींचा खणखणाट ऐकायला मिळाला. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनाच आव्हान दिले. जावली भागात कामे घेतली जातात, ती कंत्राटदारांना दिली जातात. नेत्यांच्या आजूबाजूला कंत्राटदार असतात. 100 कोटी, 150 कोटींची कामे अशा ठेकेदार मंडळींनाच दिली जात आहेत. माझी लढाई विठ्ठलाशी नाही, बाजूच्या बडव्यांशी आहे. तेच नेतृत्वाचे महत्व कमी करुन टाकतात. त्यांनी कंत्राटदारांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत. आम्ही मात्र नवीन चेहऱ्यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे, अशी टीका आ. शशिकांत शिंदे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, तुमच्या कामासाठी या हुमगावला, या मंत्रालयात, या साताऱ्यात, या कोरेगावला अशी फसवेगिरी मी करणार नाही, माझ्या सुरुचीवर आलात तर नक्की काम पक्के होते, मी कामाचा माणूस आहे, अशा शब्दांत ना. भोसले यांनी आ. शिंदे यांना डिवचले. गरज नसताना मला कुणी डिवचलं आणि माझ्या नादाला लागला तर मी छत्रपतींची औलाद आहे. लक्षात ठेवा, मी काय लुंगासुंगा नाही, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी पहिल्यांदाच आक्रमक पवित्रा घेतला.

ना. एकनाथ शिंदे यांनीही बोंडारवाडीचे धरण पूर्ण करणारच, दहशत मोडून काढणार असे म्हटले होते, त्यालाही ना. शिवेंद्रराजेंनी खडसावून प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ना. एकनाथ शिंदे यांचे कान कोणी तरी भरत आहे. काहींनी दिलेली स्क्रिप्ट ते भाषणामध्ये वाचून दाखवत आहेत. ना. शिंदे हे मोठे नेते आहेत. त्यांना महाराष्ट्र मानतो. मात्र, त्यांच्या आजूबाजूला असलेले बगलबच्चे त्या पात्रतेचे आहेत का? हे आधी ना. शिंदे यांनी पहावे, असे उत्तर ना. शिवेंद्रराजेंनी दिले.

खंडाळा तालुक्यातील 14 गावांच्या पाण्याचा प्रश्न इथले नेतृत्व सोडवू शकले नाही. कारण हे नेतृत्व कुचकामी आहे, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यावर टिका केली होती. त्याला मकरंद पाटील यांनीही उत्तर दिले. बाहेरच्यांनी येवून आमच्या माणसांना सांगण्याचे कारण नाही. 14 गावांच्या पाण्याचा प्रश्न हा मकरंद पाटीलच सोडवणार आहे, असेही त्यांनी उत्तर दिले. महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी धरणाबाबतही विरोधकांकडून ना. मकरंद पाटील यांच्यावर टीका केली गेल्यानंतर खा. नितीन पाटील यांनी विरोधकांना चांगलेच खडसावले. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण व किसनवीरआबांच्या जिल्ह्यात काही शक्ती उदयाला आल्या आहेत. कोणतीही तत्वाची बैठक त्यांना नाही. आर्थिक ताकदीवर राजकारण करुन सत्तास्थाने मिळवायची, असे राजकारण येवू पाहत आहे.

खंडाळ्याचे भाजपचे उमेदवार नितीन भरगुडे -पाटील यांनी मकरंद पाटील यांच्यावर टिका करताना खंडाळयातील राजकीय घरे त्यांनी संपवली, असे म्हटले. त्याला मकरंद पाटील यांनीही उत्तर दिले. आदल्या दिवसापर्यंत निवडणुकीच्या नियोजनात आमच्यासोबत असलेल्या हा व्यक्ती दुसऱ्या दिवशी फरार झाला. माणूस किती लबाड असावा, किती खोटारडा असावा, माझ्या आयुष्यात एवढा लबाड, ढोंगी आणि खोटा माणूस मी बघितला नाही. माझ्याच डोक्यावर परिणाम झाला होता का कुणास ठावून दोनदा माझ्याविरोधात लढला तरीही त्याला मी दोनदा मी जवळ केला. ग्रामविकास मंत्र्यांना भेटायला जातानाही माझ्याशी हा माणूस फोनवरुन प्रचाराच्या नियोजनाचे बोलत होता. काय भयंकर माणूस आहे. सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. इथून पुढे त्या व्यक्तीला माझ्याकडे थारा असणार नाही. मी एकवेळ राजकारणातून घरी बसेन पण तुला माझ्याकडे थारा नाही. जनतेलाही उल्लू बनवलं आणि आम्हालाही उल्लू बनवलं, अशा शब्दात मकरंद पाटील यांनी पहिल्यांदाच जहाल भाषा वापरत भरगुडेंचा समाचार घेतला.

लुंग्यासुंग्या नाही मी; पण छत्रपतींची औलाद : शिवेंद्रराजे पहिल्यांदाच ‌‘कडक‌’

राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच शिवेंद्रराजेंनी अत्यंत आक्रमक असे विधान जावलीत केले. सांगता सभेतील त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवेंद्रराजे म्हणाले, काहीजण 2029 मध्ये होणारी मतदारसंघाची पुनर्रचना बघून बोलत आहेत. या मतदार संघाची पुनर्रचना करणारा सगळ्यांचा एकच बॉस आहे त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यामुळे कसे मतदारसंघ करायचे, हे आम्हाला चांगले माहीत आहे. तुम्हाला सोयीचे करून पाहिजे असेल, तर मला येऊन भेटा. मी देवेंद्रजींकडून तुमची सोय करून देतो; पण गरज नसताना मला जर कुणी डिवचलं आणि माझ्या नादाला लागला, तर मीसुद्धा छत्रपतींची औलाद आहे, लक्षात ठेवा. मी काय कुठला लुंग्यासुंग्या नाही; अशा शब्दांत शिवेंद्रराजेंनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT