Satara ZP  Pudhari
सातारा

Satara ZP: सभापतिपदांसाठी आज झेडपीत पुन्हा सामना

भाजप ‌‘चौकार‌’ मारणार की राष्ट्रवादी सेना पलटवार करणार?

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या ऐतिहासिक राड्याचे पडसाद अजूनही उमटत असतानाच आज शनिवारी जिल्हा परिषदेच्या उर्वरित चार सभापतिपदांच्या निवडी होत आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी असा सामना पुन्हा रंगणार असून भाजप या सभापतिपदाच्या निवडणुकीत चौकार मारणार की राष्ट्रवादी सेना अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढत पलटवार करणार, याविषयी संपूर्ण राज्यात उत्सुकता आहे.

सातारा जिल्हा परिषदेत भाजप 27, राष्ट्रवादी काँग्रेस 20, शिवसेना शिंदे गट 15, राष्ट्रीय काँग्रेस 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गटात राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांवर अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. या राड्याचे पडसाद राज्याच्या विधानसभा व विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. सध्या या प्रकरणाची राज्य शासनाकडून चौकशी सुरू आहे. अशातच शनिवार, दि. 4 एप्रिल रोजी विषय समिती सभापती निवडी होणार आहेत. शिक्षण व अर्थ समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती, समाजकल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती या चार विषय समितीच्या सभापती पदांसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी तर भाजपचेच चारही सभापती होणार असा चंग बांधला आहे. तर पालकमंत्री ना. शंभूराज देसाई तसेच मदत व पुनवर्सन मंत्री ना. मकरंद पाटील यांनीही सभापतिपदासाठी रणनीती आखली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीदरम्यान, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सत्ता संघर्ष टोकाला गेला. त्यामुळे सभापतिपदासाठीही संघर्ष होणार की तिन्ही पक्ष सामोपचाराने निवडी करणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेच सभापतिपदासाठी पक्ष कोणकोणत्या तालुक्यांना संधी देणार, याकडेही नजरा आहेत.

सभापती निवडीवेळी मतदान होणार असले तरी सर्वच पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सभापतिपदासाठीही भाजपकडून जोरदार रणकंदन सुरू झाले आहे. अनेक सदस्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांनी आपली नावे पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. भाजप अध्यक्ष व उपाध्यक्षपदी इच्छुक असूनही संधी न मिळालेल्या नाराजांना पक्षश्रेष्ठी विषय समित्यांचे सभापतिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT