धनंजय क्षीरसागर
वडूज : मागील पंधवरड्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणांचे प्रारुप आखाडे जाहीर करण्यात आले. त्यानंतर खटाव तालुक्यातील प्रमुख नेते तसेच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पध्दतीने जोरात तयारी सुरु केली असून जोर-बैठकांना ऊत आला आहे. आता उमेदवारांना फक्त आरक्षण सोडतीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. आज मितीला पक्षीय पातळीवर भाजपने जोरदार निवडणूक तयारी सुरु केल्याचे जाणवते. त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाची तयारी जाणवते. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उध्दव ठाकरे गट हे आघाडी करुन लढणार की स्वतंत्रपणे लढणार हा उत्सुकतेचा भाग आहे.
खटाव तालुक्यात आता नवीन 7 जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती गणांची निर्मिती झाली आहे. यामध्ये कातरखटाव या नवीन गटाची निर्मिती करण्यात आली आहे. एकंदर पाहता या गटाच्या निर्मितीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. असे असले तरी भाजपाच्या मजबूत गडाची सुभेदारी देताना जयाभाऊंचा कस लागणार आहे. या ठिकाणी माजी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण यांना पंचायत समितीवरुन जिल्हा परिषदेला प्रमोशन मिळावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा राहू शकते.
दुसर्या बाजूला कातरखटावचे सुरुवातीपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते विशाल बागल यांनी गट निर्मितीनंतर आनंदोत्सव साजरा करत आपली मजबुत दावेदारी करण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. त्याचबरोबर मागील एका जिल्हा परिषद निवडणुकीत निमसोडकर मोरे, देशमुखांना जोरदार टक्कर दिलेले बनपुरीचे माजी सरपंच रामभाऊ देवकर-पाटील हेही कायम आघाडीवर आहेत. याशिवाय तानाजी बागल, संजय बागल यांच्याही नावाची चर्चा आहे. तर त्यांच्या विरोधात बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, हिंगणेचे उद्योजक सा. बा. निकम, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके, पेडगांवचे माजी सरपंच अंकुशराव दबडे, सातेवाडीचे माजी सरपंच हणमंतराव कोळेकर, प्रशांत जाधव आदी नावे चर्चेत आहेत.
औंध जिल्हा परिषद गटातील लोणी वि.का.स.सेवा सोसायटीचे चेअरमन योगेश फडतरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गटातील प्रत्येक गावात पोष्टरबाजी करण्याबरोबरच वाहनांची रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. लोणी, औंध, नागाचे कुमठे व अन्य काही ठिकाणी छोटे-मोठे समाजोपयोगी कार्यक्रम करत चांगली वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. फडतरे हे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे समर्थक असले तरी औंध येथील एका कार्यक्रमात माजी जि.प. अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या समर्थकांनीही हजेरी लावल्याने जाणकारांच्या भूवया उंचावल्या आहेत. या ठिकाणी भाजपाच्यावतीने मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू उद्योजक अंकुश गोरे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोडीस तोड उमेदवार देण्याच्या दृष्टीने फडतरे यांना राजाश्रय मिळाल्यास राजकीय जाणकारांना आश्चर्य वाटणार नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसेसावळी येेथेही भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांचे बंधू, वर्धन अॅग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांचा वाढदिवस मोठ्या जोमात साजरा करण्यात आला. मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. आ. अतुल भोसले यांच्याबरोबर आ. मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांची भूमिपूजने, लोकार्पण सोहळे घेण्यात आले. या निमित्ताने आ. घोरपडे व कदम यांच्यामध्ये सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आलेली कटूता कमी करण्याच्या दृष्टीने ‘आस्ते कदम’ टाकल्याचे जाणवते. त्यांच्या विरोधात सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, राज्य मजूर फेडरेशनचे माजी संचालक सी. एम. पाटील यांची नांवे चर्चेत आहेत. तर माजी जिल्हा परिषद सदस्य पै. जितेंद्र पवार हे वस्तादाची भूमिका करणार की पुन्हा लंगोट लावून मैदानात उतरणार याबाबत औत्सुक्य आहे.
निमसोड येथे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे यांनी मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात स्नेहमेळाव्याबरोबर स्नेह भोजनाचेही आयोजन केले होते. या ठिकाणी हजारोंची गर्दी जमली होती. यामध्ये गावासह गटातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. पारंपारिक विरोधक रणजितसिंह देशमुख यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली होती. मायणी गटात प्रस्थापित नेते सुरेद्र गुदगे यांनीही छोट्या-मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली सक्रीय घोडदौड सुरु केली आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार डॉॅ. दिलीप येळगावकर यांचे सुपुत्र अभिजीत येळगावकर अथवा सुनबाई सौ. रेणू येळगावकर निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याशिवाय गावांची आदलाबदल झाल्यास हिवरवाडीचे सुपुत्र माजी उपसभापती बाळासाहेब माने यांनीही गुदगे यांच्याशी दोन हात करण्याची तयारी दर्शवली आहे. खटाव गटाचे रुपांतर पुसेगावमध्ये झाले आहे.
इतक्या दिवस शिवसेना आ. महेश शिंदे व खटावचे युवा नेते राहुल पाटील हातात हात घालून काम करत होते. परंतू मागील विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी माण मतदारसंघातील आपले सासरे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या निवडणुकीसाठी झोकून देवून काम केले होते. तेव्हापासून आ. शिंदे व पाटील यांच्यात अंतर वाढू लागल्याची चर्चा आहे. आता पुसेगावचा समावेश झाल्याने पुसेगावचे युवा नेते रणधीर जाधव यांच्या रुपाने राहुल पाटील यांना तगडा पर्याय मिळाल्याची चर्चा आहे. अलिकडच्या काळात आ. शिंदे यांनी राहुल पाटील यांना सोडून एक-दोन जाहीर कार्यक्रम केले आहेत. तर राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गावातील शाळेत शालेय साहित्य वाटप करत तिरकी चाल खेळल्याची चर्चा आहे. तर जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप विधाते याचा गट वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. नजीकच्या काळात उलट-सुलट उमेदवार्या आल्या तर राजकीय जाणकारांना आश्चर्य वाटणार नाही. दुसरीकडे पुसेगाव येथील ज्येष्ठ नेते सुनिल जाधव यांचे पुतणे गौरव जाधव यांचेही नाव चर्चेत आहे. आ. महेश शिंदे पुसेगाव, बुध गटासह कोरेगाव मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढवणार की भाजपाचे कमळ जवळ करणार याबाबत औत्सुक्य आहे.
औंध, मायणी, निमसोड व कातरखटाव गटात तुल्यबळ लढतीची शक्यता...
आज मितीला औंध, मायणी, निमसोड, कातरखटाव या चार गटात भाजपा विरोधात राष्ट्रवादी अजितदादा गट अशी तुल्यबळ लढत होवू शकते. तर बुध, पुसेगाव गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे तसेच पुसेसावळी गटात माजी आमदार बाळासाहेब पाटील, भाजपा विरोधात ताकतीने उमेदवार देवू शकतात. असे असले तरी आ. शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्याशी युती अथवा सर्वच ठिकाणी स्वतंत्र उमेदवार दिले तर ते अजितदादा गटाला चांगलेच अडचणीत आणू शकतात.