Satara ZP Pudhari Photo
सातारा

Satara Water Shortage : पाणी टंचाईचा जिल्हा परिषदेलाच फटका

नागरिक व कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी भटकंती : गेल्या १० ते १२ दिवसांपासून गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेला गेल्या १० ते १२ दिवसापासून पाणी टंचाईचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करणाऱ्या यंत्रणेचीच पाण्यासाठी तडफड होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद मुख्यालयालाच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कार्यालयासह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान परिसराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

पोवईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यान रस्त्याचे काम सध्या बांधकाम विभागमाार्फत सुरू आहे. या कामामुळे जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे गेल्या १० ते १२ दिवसांपासून झेडपीत पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. जिल्हा परिषदेत दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि इतर दैनंदिन वापरासाठी पाण्याची आवश्यकता असते.

मात्र पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. विकतचे पाणी घेवून झेडपीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. मुखय इमारतीसह विस्तारीत इमारतीमध्ये पाण्याची ओरड सुरू असल्याने अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सर्वच विभागात पाण्यासाठी कर्मचारी व नागरिकांची तडफड सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT