सातारा : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या व मिनी मंत्रालय म्हणून सर्वज्ञात असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील चार मंत्री, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार अशा डझनभर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर राष्ट्रवादी की भाजपचा झेंडा फडकणार, याचा फैसला जनतेने शनिवारीच केला होता. त्याचा निकाल आज लागणार आहे. 626 उमेदवारांचे भविष्य आज खुले होणार असून संपूर्ण निकाल सोमवारी दुपारपर्यंत हाती येणार आहेत.
या निवडणुकीमध्ये भाजपने संपूर्ण जिल्ह्यात स्वबळ आजमावले आहे. कोरेगाव तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी भाजपने कमळ चिन्हावर उमेदवार उभे केले. भाजपच्या या शत-प्रतिशत नीतीला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, रासप, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, बसपा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या पक्षातर्फे उमेदवार उभे केले. या निवडणुकीतील खरी लढत ही राज्याच्या व केंद्राच्या सत्तेत असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांमध्येच झाली. सत्तेमध्ये असूनदेखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बेदखल केलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी चौताळून उठत अनेक ठिकाणी युतीचा फॉर्म्युला अवलंबला.
निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया झाली. जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 67.80 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 72.93 टक्के मतदान खंडाळा तालुक्यात, तर सर्वात कमी 60.48 टक्के मतदान जावली तालुक्यात झाले. गतवर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने मतदान घटले आहे. या घटलेल्या मतदानाचा कुणाला लाभ होतो आणि कुणाला तोटा , हे आज स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी 231 उमेदवार उभे राहिले होते, तर पंचायत समितीचा माण तालुक्यातील आंधळी हा गण बिनविरोध झाल्याने उर्वरित 129 गणांमध्ये 395 उमेदवार उभे होते.
जिल्हा परिषद आणि ‘पंचायत समिती मिळून 626 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. गेल्या महिनाभरापासून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर जाहीर सभा मर्यादित स्वरुपात झाल्या. पण छुपा प्रचार मोठ्या प्रमाणावर झाला. प्रचाराच्या या समुद्रमंथनातून कोण जिल्हा परिषदेची सत्ता मिळवणार? याबाबत गेल्या दोन दिवसांपासून तर तर्कवितर्क लढवले जात आहेत, अंदाज व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, या निवडणुकीमध्ये भाजपने जिल्हा परिषदेचे 59 गट व पंचायत समितीचे 119 गण असे एकूण 178 उमेदवार उभे केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने गटासाठी 36 तर गणांसाठी 74 उमेदवार उभे केले होते.
अजित पवार गटाशी मैत्री केलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने झेडपी गटाच्या 10 जागा तर गणाच्या 19 जागा लढवल्या. शिवसेना शिंदे गटाने पाटण तसेच फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीसोबत युती करुन धनुष्यबाणावर उमेदवार उभे केले होते. शिवसेना शिंदे गटाने जिल्हा परिषदेच्या 37 तर गणाच्या 72 जागा लढवल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितीच्या 18 जागा लढवल्या. राष्ट्रीय समाज पक्षाने जिल्हा परिषदेच्या 5 तर पंचायत समितीची 1 जागा लढवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा परिषदेचे 2 गट लढवले. वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेचे 11 तर पंचायत समितीच्या 13 जागा लढवल्या. रिपाईने जिल्हा परिषदेच्या 2, काँग्रेसने जिल्हा परिषदेचे 8 तर पंचायत समितीच्या 5 जागा लढवल्या.
यंदाची निवडणूक वेगळी ठरली. तब्बल नऊ वर्षानंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक जण निवडणूक लढण्यासाठी उतावीळ झाले होते. नगरपालिका निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील महायुतीचे गणित जुळणार नाही, हे अनेक उमेदवारांना माहित होते. त्यामुळे अनेकांनी विविध पक्षांच्या मांडवाखाली जाऊन मुलाखतींचे सोपस्कार पूर्ण केले. एक तरी पक्ष आपल्याला उमेदवारी देईल. हा कयास यामागे उमेदवारांचा होता आणि तसेच घडले. राष्ट्रवादीने डावललेले भाजपमध्ये गेले. भाजपने डावलेले राष्ट्रवादीत आले. तर काहीजण शिवसेना शिंदे गटात गेले. तिथेही थारा न मिळणारे शिवसेना उबाठा, वंचित, रासप अशा पर्यायांना जाऊन मिळाले. त्यामुळे जे अपक्ष उभे राहणार होते, त्यांना त्या-त्या पक्षाचे तिकीट मिळाले. अनेकांनी अपक्ष उभे राहण्याचा पर्याय निवडला.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीतल्या नेते मंडळींनी एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका केल्या. लोकांसाठी आम्हीच कसे कामाचे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून जास्तीत-जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांनी प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न कितपत फलदायी ठरतात, हे आज समजणार आहे.