सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत अनेक मातब्बरांच्या दांड्या गूल झाल्या आहेत. माजी जि. प. अध्यक्ष उदय कबुले, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, प्रदीप विधाते, वसंतराव मानकुमरे, भीमराव पाटील, दीपक पवार, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे, राजेेंद्र राजपुरे या मातब्बरांचा लोच्या झाला आहे. त्यांना लगतच्या मतदारसंघात एकतर घुसखोरी करावी लागेल किंवा सौभाग्यवतींना, सूनबाईंना एन्ट्री द्यावी लागेल. दरम्यान, 65 गटांपैकी 40 गट खुले झाले असल्यामुळे आणखी चुरस वाढणार असून, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना झेडपीत इनिंग सुरू करण्याची लॉटरी लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या 65 गटांची आरक्षण सोडत झाली. माजी जि.प. अध्यक्ष उदय कबुले व उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील हे शिरवळ गटातून पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र, हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे. कबुले यांनी कुणबी प्रमाणपत्र काढले असले, तरी त्यांचा सामना भाजपचे प्रबळ अनुप सूर्यवंशी यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
फलटण तालुक्यात 8 गटांपैकी 6 गटांवर आरक्षण पडले आहे. गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर हे पारंपरिक कोळकी गटातून निवडणूक लढवू शकतात. मात्र, संजीवराजे व शिवांजलीराजे ना. निंबाळकर यांचे हक्काचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांना लगतच्या मतदारसंघात घुसखोरी करावी लागणार आहे. माण तालुक्यात आंधळी, बिदाल, मार्डी हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव गट झाले आहेत. तर कुकुडवाड गट सर्वसाधारण पडल्याने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप हे या गटातून इच्छुक आहेत. खटाव तालुक्यात खटाव गट हा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांची संधी हुकली आहे. निमसोड गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने नंदकुमार मोरे यांची पुन्हा संधी हुकली आहे. मायणी गटात माजी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांना पुन्हा लॉटरी लागली आहे. कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बु. जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ यांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर वाठारकिरोली गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाला असल्याने माजी कृषी सभापती भीमराव पाटील यांची संधी हुकली आहे.
वाई तालुक्यात बावधन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला असल्याने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भुईंज जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असल्याने किसनवीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांचा पत्ता कट झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यात भिलार गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला असल्याने जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, प्रविण भिलारे, नितीन भिलारे यांचा पत्ता कट झाला आहे. जावली तालुक्यात म्हसवे गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांचा पत्ता कट झाला असला तरी त्यांनी कुणबी दाखला काढल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तसेच कुडाळ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला असल्याने माजी जि. प. सदस्य दिपक पवार यांचा पत्ता कट झाला आहे. कुसुंबी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला असल्याने अर्चना रांजणे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. कुडाळगट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने या गटातून सुहास गिरी यांच्या पत्नी जयश्री गिरी यांना संधी मिळू शकते.
सातारा तालुक्यात पाटखळ गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला असल्याने माजी पंचायत समिती सदस्य राहूल शिंदे व माजी महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांचा पत्ता कट झाला आहे. कारी गट सर्वसाधारण झाला असल्याने परळीचे नेते राजूभैय्या भोसले यांना संधी मिळणार आहे. लिंब गट खुला झाला असला तरी माजी उपसभापती जितेंद्र सावंत की अन्य कोणाला संधी मिळते हे औत्स्युक्याचे ठरणार आहे. शेंद्रे गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाला असल्याने बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांची संधी हुकली आहे. कराड तालुक्यात मसूर गट सर्वसाधारण खुला झाला असल्याने माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांना लॉटरी लागली आहे. पाल गटही सर्वसाधारण झाला असल्याने कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, सैदापूर गटातून सागर शिवदास तर येळगाव गटातून अॅड. उदयसिंह पाटील, अॅड. राजाभाऊ पाटील हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. म्हावशी गट खुला झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेश पवार पुन्हा निवडणूक रिंगणात दिसण्याची शक्यता आहे.