Satara Zilla Parishad 
सातारा

Satara News : सत्तेच्या साठमारीत बाजी कुणाची?

झेडपी अध्यक्ष निवडीकडे लक्ष : प्रशासनाकडून कार्यवाही

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड शुक्रवार, दि. 20 मार्च रोजी होत आहे. आपलाच अध्यक्ष व्हावा यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच आहे. मात्र, राष्ट्रवादी-शिवसेनेने आपले सदस्य परराज्यात नेले आहेत. ते थेट अध्यक्षांच्या निवडणुकीवेळीच येणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपकडून फोडाफोडीचा प्रयत्न केला जात आहे. या सत्तेच्या साठमारीत नक्की बाजी कोण मारणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये सोमवारी झालेल्या सभापती व उपसभापती निवडीमध्ये राजकीय कुरघोड्यांचे राजकारण रंगले. सभापतिपदांच्या निवडीत बराच ट्विस्ट आल्याने आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीमध्ये नक्की काय होणार? याकडे नजरा लागल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत इतिहासात भाजपने प्रथमच सर्वाधिक जागा मिळवल्या. मात्र, निवडणूक काळात भाजपने दिलेला स्वबळाचा नारा आणि महायुतीच्या नेत्यांच्या मतदारसंघात केलेली घुसखोरी यामुळे महायुतीचा काडीमोड झाला. राष्ट्रवादी-शिवसेना या दोन्ही पक्षांनी भाजपच्या या जाचाला कंटाळून एकत्र येत निवडणूक लढवली. यामध्ये त्यांना अपेक्षित यशही मिळाले आहे. झेडपी अध्यक्ष होण्यासाठी 33 मतांची आवश्यकता आहे तर राष्ट्रवादीकडे 21 आणि शिवसेनेकडे 15 सदस्य असल्याने या दोन्ही पक्षांच्या समन्वयातूनच अध्यक्ष होईल, अशी शक्यता आहे. मात्र, भाजपचे फोडाफोडीचे राजकारण पाहता त्यांच्याकडूनही शेवटपर्यंत प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दि. 20 मार्च रोजी झेडपी अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने गुप्तपणे राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांमध्ये अध्यक्षपदाच्या नावावर खलबते सुरू आहेत. अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण आहे. या आरक्षणाचे सदस्य दोन्ही पक्षांकडे आहेत. यामध्ये सर्वसमावेशक नाव कोणते असेल? ना. शंभूराज देसाई, ना. मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर हे कुणाला संधी देतात?याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT