सातारा : पालकमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी स्वतःचे सदस्य तुरुंगातून कैद्यांसारखे जिल्हा परिषदेमध्ये आणले. दीड-दीड महिना या सदस्यांना कोंडून ठेवून सुद्धा हे सदस्य तुमच्याकडे टिकले नाहीत. राष्ट्रवादीचे सदस्य कामेश कांबळे दोन दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांना भेटून ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत, मी शिवेंद्रराजेंचा कार्यकर्ता आहे’, हे सांगून आले होते. त्यांना पुन्हा किडनॅप करून नेले गेले. कामेश कांबळेला पालकमंत्री सायरन वाजवत घेऊन आले आहेत. हाणामारी करण्यासाठी त्यांनी चार हजार लोक बोलवले, असा गंभीर आरोप आ. महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर शनिवारी आ. महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. आ.महेश शिंदे म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी महायुतीच्या झालेल्या बैठकीत युतीबाबत ज्या-त्या आमदाराने त्याला योग्य वाटेल, त्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघात निर्णय घ्यावा, असा निर्णय झाला होता. मी माझ्या मतदारसंघांमध्ये युतीमधील दोन्ही पक्षांशी चर्चा केली; परंतु एका पक्षाने (राष्ट्रवादीने) स्पष्ट नकार दिला होता.
त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीत माझ्या मतदारसंघातील एकूण सात पैकी 4 जागा शिवसेना आणि 3 जागा भाजप लढवणार, असं ठरलं होतं. प्रिपोल अलायन्स ज्यांच्याबरोबर होते त्यांच्याबरोबर राहणं हे आमचं कर्तव्यच होतं. पालकमंत्र्यांचा प्रिपोल अलायन्स राष्ट्रवादीबरोबर होता म्हणून ते त्यांच्या सोबत गेले. आमचा प्रिपोल अलायन्स भाजप सोबत होता म्हणून आम्ही भाजपबरोबर राहिलो. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे साताऱ्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीत असल्याचे कळल्यावर आम्हाला त्यांच्यासोबत जाण उचित वाटलं नाही. मी कोणतीही पक्षविरोधी कारवाई केली नाही. उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडण्यामागचे कारणच ते होते, त्यावेळी जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती साताऱ्यात आज झाली.
मला ना. एकनाथ शिंदे यांनी बोलवून माझ्या भूमिकेबद्दल विचारलं होतं. तेव्हा मी त्यांना स्पष्ट केलं होतं की मी भाजपबरोबर लढलो आहे. आमची प्रिपोल अलायन्स भाजप बरोबर आहे. दुसऱ्या पक्षाबरोबर आम्ही अलायन्स करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी आम्हाला फार किंमत दिली नाही. त्यानंतर मी तीन चार वेळा साहेबांना भेटायचा प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही. दरम्यान, आ. महेश शिंदे हे नेमके कुठल्या पक्षाचे? अशी चर्चा सुरु असल्याबाबबत विचारले असता मी महायुतीचा असल्याचे ते म्हणाले.