सातारा : जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग व्हावा. यासाठी जिल्हा परिषदेने जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात तब्बल ५ हजार २५२ वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरत असल्याने सातारा जिल्ह्याचे जलसंवर्धनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरत आहे.
सातारा जिल्ह्यात काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत पावसाचे अनियमित प्रमाण आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई अशा परस्परविरोधी परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे उपलब्ध पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेती आणि भूजल पुनर्भरणासाठी व्हावा, यासाठी वनराई बंधारे हा प्रभावी पर्याय ठरत आहे.
वनराई बंधारे उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायती, पंचायत समित्या, शेतकरी, महिला बचत गट, युवक मंडळे आणि स्थानिक ग्रामस्थांना सहभागी करून घेतले जात आहे. अनेक ठिकाणी लोकसहभागातून आणि श्रमदानातून बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे जलसंधारणाची ही मोहीम केवळ शासकीय उपक्रम न राहता लोकचळवळीचे स्वरूप घेत आहे.
जलसंवर्धनासाठी केवळ बंधारे उभारणे पुरेसे नसून त्याचे योग्य नियोजन, देखभाल आणि सातत्याने लोकसहभाग आवश्यक आहे. प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील ओढे, नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांचा अभ्यास करून पाणी अडवण्याचा उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवला तरच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे.
शेतीला आणि भूजल पातळीला मिळणार आधार
वनराई बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात ओढे, नाले आणि लहान जलप्रवाहातून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो, हे पाणी काही काळ साठून राहिल्याने जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी विहीरी, कूपनलिका आणि परिसरातील जलस्त्रोतांच्या पुनर्भरणाला हातभार लागू शकतो. याचा फायदा रब्बी हंगामातील शेती, जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता आणि गावांच्या पाणी नियोजनाला होवू शकणार आहे.