रामराजे निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर  
सातारा

Satara : राजे गटाची अस्तित्वाची, तर खासदार गटाची वर्चस्वाची लढाई

फलटण तालुक्यात टोकाचा संघर्ष : राजकीय दिशा कोणत्या वळणावर जाणार?

पुढारी वृत्तसेवा
पोपट मिंड

फलटण : फलटण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संघर्षपूर्ण वातावरणात तीव्र चुरशीच्या होतील, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा राजे गट विरुद्ध माजी खासदार यांच्या गटात टोकाचा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार, हे निश्चित. राजे गट अस्तित्वासाठी तर खासदार गट वर्चस्वासाठी लढणार आहे. खासदारकी व आमदारकीला तालुक्यात राजे गटाविरोधात मतदारांनी कौल दिला असला तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणत्या बाजूने राहणार? तसेच तालुक्यातील राजकीय दिशा कोणत्या वळणावर जाणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गत 30-32 वर्षांपासून जि. प. व पं. स. च्या निवडणुकीत राजे गटाकडे सत्तेच्या चाव्या होत्या. 1995 ला आमदारकीची सत्ता मिळाल्यानंतर राजे गट सातत्याने फ्रंट फूटवर आहे. तालुक्यातील सर्व सत्तास्थाने राजे गटाकडे असल्याने विरोधकांचा प्रभाव कमीच होता. मात्र अलीकडच्या 6-7 वर्षात माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या गटाने प्रबळ विरोधकाची भूमिका निभावली आहे. विशेषतः 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह ना. निंबाळकर मोठ्या मताधिक्याने माढ्याचे खासदार झाल्यानंतर राजे गट विरुद्ध खासदार गटात खर्‍या अर्थाने राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. जि. प. व पं. स. निवडणुकीत राजे गट व माजी खासदार गट आमने-सामने येणार असून स्थानिक पातळीवरील राजकीय ताकद जोखण्याची ही संधी दोन्ही गट आपापल्या समर्थकांसह निवडणुकीत प्रचंड जोर लावणार हे निश्चित आहे. या दोन्ही गटात गत 6-7 वर्षांपासून मोठा राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे.

आ. रामराजे यांची गत 30 वर्षांपासून तालुक्यावर मजबूत पकड होती. तर 2024 मध्ये झालेला खासदारकीचा पराभव जिव्हारी लागल्यानंतर रणजितसिंह यांनी प्रचंड मेहनत घेऊन राजे गटाच्या अनेक समर्थकांना आपल्याकडे वळवले. राजकीय तडजोडी स्वीकारून आपला बिन्नीचा मोहरा घटक पक्षाकडे पाठवून राजे गटाकडून आमदारकी खेचून आणली. विधानसभेच्या निवडणुकीत राजे गटाच्या दीपक चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर राजे गटाचे आउटगोईंग मोठ्या प्रमाणात सुरू झाले. त्यामुळे खासदार गटाची गावोगावी ताकद वाढली आहे.

मागील निवडणुकीत राजे गटाने 7 पैकी 6 जि. प. गटांवर तर पंचायत समितीच्या 14 पैकी 12 जागांवर निर्विवादपणे वर्चस्व मिळवले होते. विरोधकांना जि. प.ची 1 व पं.स.च्या 2 जागा मिळाल्या होत्या. आमदारकीच्या निवडणुकीनंतर राजे गटाचे अनेक मुख्य मोहरे व गावोगावचे छोटे मोठे कार्यकर्तेही खासदार गटाकडे गेले आहेत. अनेक वर्षांपासून राजे गटाची एक हाती सत्ता असल्याने अनेक गावात राजे समर्थकांचेच दोन-दोन, तीन-तीन गट कार्यरत होते. त्यातील काही गटांनी खासदार गटात प्रवेश केला आहे. असे असले तरी आजही गावोगावी राजे गटाचीही मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी जि. प., पं. स. च्या निवडणुका या दोन्ही गटांमध्ये अत्यंत चुरशीच्या होतील. दोन्ही गटांसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. अस्मितेची व अस्तित्वाची ही लढाई निकराने लढून दोन्ही गट वर्चस्ववादासाठी धडपडताना दिसत आहेत. राजेगट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे निश्चित. याउलट आमदारकीची सत्ता मिळाल्याने तालुक्याची सर्व सत्ता स्थाने आपल्याकडे खेचून आणण्यासाठी माजी खासदार गट जीवाचे रान करणार हे ही निश्चित. अत्यंत अटीतटीच्या होणार्‍या संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय युद्धात कोण बाजी मारणार? याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

इच्छुकांमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार?

जि. प., पं. स. च्या निवडणुका तब्बल आठ वर्षांनी होत असल्याने व नव्या फेररचनेत व आरक्षणात झालेल्या बदलामुळे तालुक्यात इच्छुकांची संख्या अधिक दिसून येत आहे. विशेषतः माजी खासदार गटात मोठ्या प्रमाणात झालेल्या इनकमिंगमुळे त्या ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे. त्याचबरोबर गावोगावी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून गट-गणात आपापल्या परीने संपर्क यंत्रणाही राबवली आहे. तालुक्यातील निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र हे अजून निश्चित झालेले नाही. एकत्रित लढत असताना भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यामध्ये जागांची वाटणी कशी होणार? त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत सोडवतानाही नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT