सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (यूपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत सातार्याचा डंका वाजला आहे. परळी येथील प्रणव विनय कुलकर्णी याने देशात 256 वी रँक तर मर्ढे येथील संकेत अरविंद शिंगटे याने 479 व्या रँकसह देदीप्यमान यश मिळवले. यूपीएससीमध्ये सातार्यातील दोघांनी झेंडा लावल्याने जिल्ह्याच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.
सध्या तरुणाईमध्ये स्पर्धा परीक्षेची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे लाखो तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जाण्याची स्वप्नं बघत आहेत. 2024 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. त्यामध्ये जिल्ह्यातील सुपुत्रांनी यश मिळवले आहे. मूळचा परळी व सध्या सातार्यात राहणार्या प्रणव विनय कुलकर्णी याने 256 वी रँक मिळवत
परीक्षा उत्तीर्ण केली. प्रणवचे प्राथमिक शिक्षण सातारा इंग्लिश मिडीयम स्कूल तर उच्च माध्यमिकचे पोदार इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. तसेच सांगलीतील वालचंद कॉलेजमधून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे.
मागील चार वर्षांपासून दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली. तर दुसर्या प्रयत्नात हे यश मिळवले. प्रणवने यापूर्वी दोन वेळा सीडीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, तेथे नोकरी न करता युपीएससीला प्राधान्य दिले. त्याचे प्रणवचे वडील विनय कुलकर्णी हे वीज वितरण विभागात वर्ग 3 अधिकारी पदी कार्यरत आहेत. आई रोहिणी कुलकर्णी या गृहिणी आहेत.
मर्ढे येथील संकेत अरविंद शिंगटे याने देशात 479 वी रँक पटकावली आहे. संकेतचे प्राथमिक शिक्षण सातार्यातील जे. डब्ल्यू आयर्न अॅकॅडमीत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट पॉल स्कूल, दादर येथे झाले आहे. विद्यालंकार कॉलेज, वडाळा येथून बीई इलेक्ट्रॉनिक्स ही पदवीही त्याने घेतली आहे. पदवीनंतर दोन वर्षे टीसीएस कंपनीत नोकरी केली. त्यानंतर पुन्हा युपीएससीची तयारी सुरु केली. संकेतचे चुलते सहाय्यक पोलिस आयुक्त अविनाश शिंगटे यांच्यारुपाने घरातच स्पर्धा परीक्षा व अधिकारी पदाची परंपरा असल्याने संकेतही नोकरीत रमला नाही. संकेतने यापूर्वी इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) ची परीक्षाही उत्तीर्ण केली. मात्र, त्या पोस्टवर हजर झाला नाही. संकेतने दुसर्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा क्रॅक केली.
मर्ढे गावातून यापूर्वी अनेकजणांनी एमपीएसससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र, संकेत युपीएससी परीक्षा पास होणारा पहिलाच युवक आहे. संकेत हा माजी सरपंच, प्रगतशील शेतकरी, किसनवीर साखर कारखान्याचे एचआर मॅनेजर अरविंद शिंगटे यांचा मुलगा आहे. त्याच्या आई जयश्री या गृहिणी असून माजी सरपंच राहिल्या आहेत. संकेतचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. जिल्ह्यातील सुपुत्रांनी देशपातळीवर नावलौकिक वाढवल्याने सातारकरांचा उर अभिमानाने भरुन आला आहे.