फलटण : कुटुंबातील मुलीवर झालेल्या कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी महिलेच्या नावाने खोटे इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह नीरा नदी पात्रात टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांना अटक केली आहे.
अविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा अविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत व अर्चना ज्ञानेश्वर भगत (सर्व रा. पिंप्रद, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी गोखळी (ता. फलटण) येथील नीरा नदीपात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली; मात्र डोक्यावरच्या जखमा व परिस्थिती संशयास्पद वाटल्याने तपासाची दिशा बदलली. तपासात मृताची ओळख अंकुश बापू नरबट (वय 22, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) अशी पटली.
तो माण तालुक्यातील रहिवासी असताना त्याचा मृतदेह फलटण तालुक्यात कसा आढळला, याबाबत पोलिसांना संशय आला. अंकुश नरबट याने आरोपींच्या कुटुंबातील एका मुलीबाबत गैरवर्तन केल्याचा आरोप होता. त्याच रागातून आरोपींनी सूड उगवण्यासाठी कट रचला. महिलेच्या नावाने खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून अंकुशशी संपर्क साधण्यात आला आणि भेटीसाठी फलटण येथे बोलावण्यात आले. दि. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी अंकुश नरबट फलटणला आल्यानंतर संशयितांपैकी एका महिलेने त्याला तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले. तेथे इतर संशयित वेगवेगळ्या वाहनांतून आले. सर्वांनी मिळून त्याला मारहाण करून चारचाकीत टाकले आणि पिंप्रद गाव हद्दीत दुसऱ्या निर्जनस्थळी नेऊन त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोखळी गावाजवळील नीरा नदीत फेकून दिला.
गुन्हा अत्यंत नियोजनपूर्वक केल्याने सुरुवातीला पोलिसांकडे ठोस धागेदोरे नव्हते. मात्र फलटण-दहिवडी रोडवरील हॉटेल, दुकाने व पेट्रोलपंप येथील सीसीटीव्ही फुटेज, तसेच मोबाईल क्रमांकांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुराव्यांची साखळी तयार करण्यात आली आणि गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलिस अंमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, हणमंत दडस यांनी केली.