कराड : प्रेमसंबंधाच्या संशयावरून कासेगावच्या युवकाचे वाठारनजीक अपहरण करून जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या या युवकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. रहिमतुल्ला सलीम आतार (वय 27, रा. पोस्ट ऑफिससमोर, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) असे या युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी रहिमतुल्लाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कराड तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी सात संशयित युवकांना गजाआड केले आहे. सुदाम मोहन पवार (वय 27), राकेश रामदास पाटील (वय 26), अमर सुरेश खोत (वय 27), विराज युवराज तोडकर (वय 26), उमेश रवींद्र पाटील (वय 28), विशाल हणमंत शिद (वय 23) आणि ऋषीकेश धनाजी तोडकर (वय 26, सर्व रा. कासेगाव, ता. वाळवा) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेली माहिती अशी, रहिमतुल्ला हा मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय करत होता. कामानिमित्त तो सोमवारी दुपारी कासेगावहून कराडच्या दिशेने येत होता. तो कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत आल्यानंतर संशयित सात युवकांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर वाठारसह परिसरात या संशयितांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड, पीव्हीसी पाईपच्या मदतीने रहिमतुल्ला याला जबर मारहाण केली.
संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास संशयितांनी त्याला त्याच्या कासेगावातील घरी सोडले. त्यानंतर रहिमतुल्ला तेथील एका रूग्णालयात उपचारासाठी गेला. मात्र पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे का अशी दवाखान्यात विचारणा झाल्यानंतर तो कासेगाव पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविल्यानंतर अचानकपणे रहिमतुल्लाची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला उपचारासाठी तातडीने कराडच्या कृष्णा रूग्णालयात आणले. मात्र उपचारावेळी रहिमतुल्लाचा मृत्यू झाला. दरम्यान, सर्व संशयीतांना बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर केले जाणार आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गतीने चक्रे फिरवली आणि काही तासांत सर्व संशयितांना अटक केली.