फलटण : फलटण शहरातील सोमवार पेठ येथे फटाके उडवताना हातातील फटाक्यांच्या पिशवीत ठिणगी पडून गंभीररीत्या भाजलेल्या अडीच वर्षांच्या समर विशाल पवार या चिमुकल्याचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने फलटण शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाच ते सहा दिवसांपूर्वी सोमवार पेठ परिसरात घरासमोर फटाके उडवले जात असताना समरच्या हातातील फटाक्यांच्या पिशवीत पेटत्या तारकाडीची ठिणगी पडली. त्यामुळे पिशवीतील फटाक्यांनी अचानक पेट घेतला. या आगीत समर ९० टक्क्यांहून अधिक भाजला होता. त्याला तातडीने बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, भाजण्याचे प्रमाण गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ससून रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.