सातारा : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील विद्यार्थिनी सृष्टी बिरामणे हिने जीवन संपविले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या मागण्यांची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वसतिगृहाच्या रेक्टर जयश्री नकाते यांना पदावरून निलंबित केले जाणार असून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे यांना चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत रजेवर पाठवणार असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
सृष्टी बिरामणे हिच्या जीवनयात्रा संपविल्याच्या अनुषंगाने निष्पक्ष चौकशी व दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी अभाविपच्या माध्यमातून आंदोलन केले होते. यावेळी वसतिगृहाच्या रेक्टरला निलंबित करावे, प्राचार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे तसेच सृष्टीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशा मागण्या केल्या होत्या. या संदर्भात रयत शिक्षण संस्थेचे सचिव यांनी ७ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे अभाविपला संस्थेच्या निर्णयाची माहिती दिली. त्यानुसार रेक्टर नकाते यांचे निलंबन केले जाईल. तसेच प्राचार्य डॉ. साळुंखे यांना चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत रजेवर पाठविले जाणार आहे.
याशिवाय सृष्टीच्या पालकांना विद्यापीठ विमा योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळवून देण्याचा निर्णय झाला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महाविद्यालयात तक्रार निवारण केंद्र तसेच समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.