सातारा : सातार्यातील वायसी कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहावरुन उडी मारुन सृष्टी बिरामणे (वय १९) हिने आपले आयुष्य संपवले. होस्टेलमध्ये असुविधांच्या विरोधात आवाज उठवल्याने ही परिस्थिती ओढवल्याची चर्चा आहे. या घटनेने सातारच्या सायन्स कॉलेजमध्ये चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. दरम्यान, जेमतेम परिस्थिती असतानाही सृष्टीला शिकवण्याची शर्यत संपल्याने कुटुंब नाउमेद झाले आहे.
सृष्टीचे वडील शेतकरी असून त्यांना जेमतेम शेती आहे. आई कामाला जाते. घरी लहान भाऊ. सृष्टी पहिल्यापासूनच धडाडीची होती. स्पष्ट बोलणे तिचा स्वभाव होता. त्यामुळे ती आत्महत्या करेल असे आजही कोणाला पटत नसल्याची भावना गावकर्यांची आहे. सृष्टीला शालेय मार्गदर्शन तिचे चुलते करत होते. तिच्या जडणघडणीत त्यांचाही मोठा वाटा आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सृष्टी पहिलीच त्यांची उच्च शिक्षण घेत असलेली मुलगी होती. आता मात्र तिने टोकाचे पाऊल उचलल्याने बिरामणे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. नाउमेद झाले आहे. सृष्टी बिरामणे विद्यार्थिनीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीतूनही अनेक मुद्दे समोर आले आहेत. वास्तवीक सृष्टी गेल्यावर्षी देखील वायसी कॉलेजमध्ये होस्टेलमधून शिक्षण घेत होती. दोन महिन्यांपूर्वी पुन्हा ती होस्टेलमध्ये रुजू झाल्यानंतर अडचणी येवू लागल्या. ही बाब तिने कुटुंबियांनाही वेळोवेळी सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
४८ सेकंदाचा व्हिडिओ अन् खळबळ...
होस्टेलमधील असुविधांबाबत एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ सृष्टीने तयार केला असल्याचे त्या व्हिडीओमध्ये लिहिले आहे. त्या व्हिडीओमध्ये होस्टेलमधील असुविधांची बजबजपुरी दिसत आहे. हा व्हिडीओ ४८ सेकंदाचा आहे. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानेच तिच्यावर 'डूख' धरण्यात आला होता का? असा सवाल देखील त्या व्हिडीओमध्ये उपस्थित करण्यात आला असून व्हिडीओ इन्स्टाग्राम या साेशल मिडीयावर व्हायरला झाला आहे.
माझं पिल्लू आता कुठं शोधू...
सृष्टीच्या वडीलांचा तिच्यावर खूप लळा होता. तिला लाडाने ते पिल्लू म्हणत हाेते. घटनेदिवशीही ते आकांताने माझ्या पिल्लाला काय झाले? आता माझं पिल्लू कुठं शोधू? असे उद्विग्न होवून ते आकांत करत होते.