सातारा पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने 63 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. यात 56 वेळा लढती झाल्या असून, 7 लढती झाल्या नाहीत. 2 वेळा मल्ल न आल्याने लढती रद्द झाल्या. 3 वेळच्या लढतीत अनिर्णित तर 2 वर्षे कोरोनाने ही स्पर्धा रद्द झाली. त्यामुळे आजपर्यंत 56 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा पैलवानांनी मारली आहे. मात्र, यात निम्म्या कुस्ती या गुणांवर विजयी झाल्या आहेत.
कुस्तीपंढरी म्हणून ओळख असणार्या कोल्हापूरच्या मल्लांचा मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबावर आजही दबदबा कायम आहे. आतापर्यत झालेल्या 63 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पैलवानांनी समोरच्या पैलवानाला आस्मान दाखवत तब्बल 16 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. मात्र, गेली 21 वर्षे कोल्हापूरला 'महाराष्ट्र केसरी' हुलकावणी दिली आहे. दरम्यान, कोल्हापूरनंतर पुणे, सांगली व सोलापूरच्या मल्लांनी 7 वेळा या स्पर्धेची गदा पटकावली आहे.
खोबर्यावरील कुस्ती असुद्या नाहीतर महाराष्ट्र केसरी कुस्ती असुद्या पारंपरिक डावच आखाडा मारायला आजही उपयुक्त ठरत आहेत. या खेळांमध्ये डाव, चपळता, निर्णय क्षमता फार महत्त्वाची ठरते.
या खेळातील डावांचे हजारो प्रकार आहेत. त्यामध्ये कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी प्रकारांचा समावेश असतो. पूर्वीच्या काळी एकेरी पट, दुहेरी पट, धोबीपछाड, एकलांगी, ढाक, मोळी, निकाल, बांगडी, साल्टो, टांग या डावांचा मोठ्या प्रमाणात विरोधी मल्लाला चितपट करण्यासाठी वापर केला जात होता.
आजचे पैलवानही याच डावांचा वापर करत आहेत. मॅटवर होणार्या कुस्तीत एकेरी पट, दुहेरी पट, भारंदाज, साल्टो, कलाजंग या डाव वापरून पुढील पैलवानाला चितपट करतात. तर मातीवर केरी पट, दुहेरी पट, निकाल, टांग, कलाजंग या डावांचा वापर केला जातो. गेल्या दहा वर्षांत ज्या पैलवानांनी महाराष्ट्र केसरी किताब जिंकला आहे त्यांनी थंडर व साईड थ्रो, भारंदाज,धोबी या डावांचा वापर केला आहे. कुस्तीचे ऑलिम्पिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.