सातारा : सातारा जिल्ह्यात उमेदमार्फत महिला बचत गटांना मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्हा परिषदेचे सुमारे 28 हून अधिक पाझर तलाव महिला बचत गटांना देण्यात आले आहेत. झेडपीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे महिलांना रोजगाराचे साधन गावपातळीवर उपलब्ध झाले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन उत्पन्नाचे आर्थिक स्रोत निर्माण करत आहेत.
ग्रामीण भागात अलीकडच्या काळात महिलांनी असंख्य अडथळे तोडून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा ठसा उमटवून व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय बदल घडवून आणले आहेत. महिलांनी व्यवसायाच्या स्पर्धात्मक जगात स्वत:चा मार्ग तयार केला आहे. या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी व उद्योग व्यवसायात आर्थिक उन्नती करण्यासाठी जिल्हा परिषदेने महिलांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. यासाठी उमेद अंतर्गत असणाऱ्या नोंदणीकृत बचत गटांना जिल्ह्यातील पाझर तलांवामध्ये मत्स्य व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
राज्यात पथदर्शी ठरलेल्या या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील 28 समूहातील सुमारे 280 महिलांना उपजीविकेची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या पुढाकारातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. महिला बचतगटातील महिलांनी करार करुन मत्स्य शेती करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्याचा पहिलाच प्रयोग सातारा जिल्ह्यात केला जात आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना मत्स्य व्यवसाय करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे महिलांसाठी विविध उद्योग आणि व्यवसाय उभारण्याबरोबरच महिला आपल्या कुटुंबाच्या विकासाला हातभार लावू शकणार आहेत.
जिल्ह्यातील 28 तलावातील 116 हेक्टर क्षेत्रामधून सुमारे 46 टन माशांचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामधून सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांची उलाढाल होणार आहे. त्यामुळे बचतगटातील महिला मत्स्य शेतीमधून आर्थिक क्रांती घडवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तसेच अन्य तलावही महिला बचतगटांना मत्स्य शेतीसाठी देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
बचतगटामधील महिलांना उपजीविकेच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूनेच मत्स्यपालनासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीचे तलाव चालवण्यास दिले आहेत. महिलांनी मत्स्यव्यवसायास आर्थिक भरारी घेण्यास सुरुवात केली आहे. महिलांसाठी विविध उद्योग आणि व्यवसायामुळे आपल्या कुटुंबाच्या विकासाला हातभार लावू शकणार आहेत.याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सातारा