सातारा : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी राहिली आहे. वनराई बंधारे, जलतारा आणि शोषखड्ड्यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवण्याचे काम जिल्हाभर वेगाने सुरू आहे. या मोहिमेला नागरिकांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या तीन दिवसांत ५०० वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंधारणाला मोठी चालना मिळाली आहे.
वनराई बंधाऱ्यांसोबतच प्रत्येक गावात 'जलतारा' आणि 'शोषखड्डे' निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईचा धोका कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जलसंधारणाच्या उपाययोजनांबाबत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावागावांत माहिती फलक लावण्यात येत आहेत. तसेच शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना जलतारा व इतर जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. प्रत्येक घरातील महिलेला जलसंधारणाच्या चळवळीशी जोडण्यासाठी महिलांच्या हस्ते जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत आहे.
जलसंधारणाच्या या महायज्ञात ग्रामपंचायती, महिला, शेतकरी, युवक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. माझे गाव–माझी जलजबाबदारी या भावनेतून प्रत्येक गावाने जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.अडवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा उद्याच्या पाणीटंचाईवर मात करण्याची ताकद आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याला जलसुरक्षित, सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी सुरू असलेल्या या जलसंधारणाच्या महायज्ञात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जि. प प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महिलांच्या हस्ते जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून महिलांचा सहभाग, जलजागृती आणि लोकसहभाग यांना एकत्र आणणारी चळवळ आहे. प्रत्येक महिला, शेतकरी आणि ग्रामस्थाने या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या गावाच्या जलसुरक्षेसाठी योगदान द्यावे.याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी