सातारा : वाढती स्पर्धा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, करिअरसाठी वाढता आग्रह, व्यस्त जीवनशैली यामुळे महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. भारतातील महिलांच्या आरोग्यासाठी ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय हा एक गंभीर धोका बनला आहे. सातारा जिल्ह्यात वर्षभरात 289 ॲनिमिया रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलांसह संबंधित कुटुंबाचेच आरोग्य धोक्यात येत असल्याचे वास्तव जागतिक आरोग्य दिनानिमित्त घेतलेल्या आढाव्यातून समोर आले आहे.
आहारविहाराच्या बदलत्या सवयी, फास्टफूडचा अतिरेक, पौष्टिक आहाराचा अभाव, तसेच आईकडून मिळालेला वारसा यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. हवामान बदल व कुपोषणामुळे गर्भवती महिलांमध्ये रक्ताशयग्रस्त वाढत असल्याने भावी पिढी तसेच टीनएजर्स मुलांना ॲनिमियाचा धोका संभवतो. जिल्हा रुग्णालयामध्ये वर्षभरात 289 ॲनिमिया रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 20 ते 49 वयोगटातील 182 महिला तर 6 महिने ते 14 वर्षे वयोगटातील 107 बालकांचा समावेश असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
राज्यात व देशातही ॲनिमियाची समस्या बळावत आहे. सद्यस्थितीत सरासरी 10 पैकी 4 किशोरवयीन मुलींना ॲनिमियाची लक्षणे आढळून येतात. गरोदरपणात तीव्र निमियामुळे माता व बाळाच्या जीवाला धोका तसेच मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता बळावते. लोहयुक्त आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, अंजीर, मनुका, खजूर आणि मोड आलेले कडधान्य यांचा समावेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.