वेणेगाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वळसे गावच्या हद्दीत झालेल्या तिहेरी अपघातात कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला. पारोमिता आशिमकुमार देवगरिया (वय 33 रा. पिंपरी-चिंचवड) असे तिचे नाव आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला.
याबाबत माहिती अशी, पिंपरी-चिंचवड येथील पत्नी पारोमिता ही पतीसह कारमधून गुरुवारी पहाटे 4.30 वाजता बंगळूर येथील भावाकडे निघाले होते. गुरुवारी सकाळी 7.30 वाजता वळसे गावच्या हद्दीत पोहोचल्यानंतर अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे कारने चार पलट्या घेतल्या. त्यानंतर कार दुभाजकावर धडकून पुन्हा एका कंटेनरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचे इंजिन तुटून रस्त्यावर फेकले गेले. यावेळी पाठीमागून आलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकावर जाऊन धडकला. त्यापाठीमागील तीन टेम्पो ही एकमेकांना धडकले. यामध्ये कार चालक आशिमकुमार हे जखमी झाले. तर पत्नी पारोमिता जागीच ठार झाल्या. या अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प होती.
बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. आशिमकुमार यांच्या कारचा वेग जास्त होता. दोघा पती-पत्नीने सीट बेल्टही लावला होता. अपघातानंतर कारच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या गेल्या मात्र, कार पलटी खाऊन दुभाजकावर धडकल्याने तेथील पत्रा लागून पारोमिता यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.