Satara Threshing machine accident Pudhari
सातारा

Satara Threshing machine accident: मळणी यंत्रात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू

ज्वारी मळणीदरम्यान मळणीयंत्रात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना विंग (ता.कराड) येथे घडली

पुढारी वृत्तसेवा

ढेबेवाडी : ज्वारी मळणीदरम्यान मळणीयंत्रात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना विंग (ता.कराड) येथे घडली. या घटनेची नोंद कराड तालुका पोलिसात झाली आहे. घटनेने विंग परिसरात शोककळा पसरून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विंग येथील सुतारकी नावाच्या शिवारात ज्वारी काढणी व मळणीची कामे सुरू आहेत. येथील छाया बबन खबाले (वय 65) यांची सुद्धा ज्वारी मळणी सुरु होती. त्यांच्या सोबत मुलगा संदीप व पती बबन बरोबरच होते. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मळणीयंत्र शेतापर्यंत जात नव्हते. त्यामुळे त्यांनी ज्वारी खुडून रस्त्यावरील मळणीयंत्रापर्यंत आणली होती. मळणी सुरु असताना ज्वारी भरताना छाया खबाले यांचा पदर मळणीयंत्रात अडकून त्यांच्या गळ्याला साडीचा फास लागला तो निघाला नाही. हे पाहताच जवळच काम करत असलेले त्यांचे पती बबन, मुलगा संदीप यांनी तातडीने त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांनी प्रसंगावधान राखून मळणी यंत्र त्वरित बंद केले. त्यानंतर जवळच असलेल्या खुरप्याच्या सहाय्याने साडी कापून छाया यांची यंत्रातून कशीबशी सुटका केली.

अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कराड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु दुर्दैवाने, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर छाया खबाले यांची प्राणज्योत मालवल्याचे स्पष्ट करत त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयातील प्राथमिक प्रक्रियेनंतर छाया खबाले यांचा मृतदेह कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संपूर्ण गावात शोककळा पसरलेली असताना अत्यंत जड अंतःकरणाने त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले. छाया खबाले यांच्या पश्चात पती बबन, संदीपसह दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT