सातारा

सातारा : शिवेंद्रराजेंना पाडूनच रिटायरमेंट घेणार : दीपक पवार

मोहन कारंडे

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा-जावळी मतदार संघात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आ. शिवेंद्रराजे भोसले यांना पाडणार म्हणजे पाडणारच आहे. त्यांना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी आ. शिवेंद्रराजे यांना लगावला. तर सातारा नगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दीपक पवार म्हणाले, जावळी तालुक्यातील प्रश्नांबाबत आणि विकास कामांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. कुडाळ (ता. जावली) येथील मार्केट कमिटीच्या मैदानावर दि. 7 जूनला सकाळी 11 वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. त्या सभेला खा. शरद पवार यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची जाहीर सभा जावली तालुक्यात झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले चार्ज होवून कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यात चांगले वातावरण तयार झाले आहे.

दीपक पवारांनी रिटायरमेंट घ्यावी, असे आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते. या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, मी विधानसभेची निवडणूक लढवली आहे. माझी सातारा-जावली मतदार संघातून 2024 साठी तयारी सुरू आहे. त्याच निवडणुकीमध्ये आ. शिवेंद्रराजे यांना पाडणार म्हणजे पाडणारच. त्यांना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहोत. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांच्यासमवेत बैठका झाल्या आहेत. आणखी बैठका होणार असून जागा वाटपावर चर्चा होणार आहे. आ. शशिकांत शिंदे हेही पालिकेच्या निवडणुकीत आमच्यासोबत असणार आहेत.

जावली, महाबळेश्वर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, जावली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकाधिकारशाही, हुकूमशाही चालू नये म्हणून माजी आ. सदाशिव सपकाळ यांना सोबत घेऊन पॅनेल टाकले. ही सहकाराची निवडणूक होती. पक्षीय पातळीवरची निवडणूक नव्हती. तरीही पक्षाविरोधात ज्यांन-ज्यांनी त्या निवडणुकीत भूमिका घेतली होती. त्याबाबतची तक्रार पक्षाकडे झाली असून पक्षाने तशी नोंद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT