Devendra Fadnavis 
सातारा

Devendra Fadnavis| उदयनराजेंसाठी यापुढे न्‍यायाची भूमिका

ना. देवेंद्र फडणवीस : पुणे येथील भेटीत आश्‍वासन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे कार्यकर्त्यांना ताकद देण्‍यात अग्रेसर असतात. त्‍यामुळेच त्‍यांच्‍याबाबत यापुढे न्‍यायाची भूमिका ठेवून सकारात्‍मक निर्णय घेतले जातील, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

उदयनराजे यांनी पुणे येथील जेडब्ल्यू मॅरियट येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. तासभर चाललेल्या या कमराबंद बैठकीतील चर्चेकडे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या भेटीत सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांवरही चर्चा झाली. जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवडीबाबतही चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर तसेच जिल्हा बँकेचे नूतन संचालक काका धुमाळ उपस्थित होते.

चर्चेदरम्‍यान सातारा शहर व परिसरातील विकास कामे तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याबाबत उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. जिल्‍हा बँक पदाधिकारी निवडीबाबत झालेल्‍या चर्चेदरम्‍यान फडणवीस यांनी जिल्हा बँकेबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करा व मार्ग काढा, असे सांगितले. जिल्‍हा बँकेच्‍या संचालकपदी निवड झाल्‍याबद्दल फडणवीस यांनी यावेळी काका धुमाळ यांचे अभिनंदन केले. उदयनराजे यांनी विश्‍वासाने आणि सकारात्‍मक विचाराने जागेवर संधी दिली आहे. त्‍याच विचाराने पुढे वाटचाल ठेवा, असेही मुख्‍यमंत्री काका धुमाळ यांना म्‍हणाले. तत्‍पूर्वी पक्षासाठी मी झटत आलो आहे. त्‍यामुळे माझ्‍याही कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी फडणवीस यांच्‍याशी बोलताना व्‍यक्‍त केली होती. तोच धागा पकडत फडणवीस यांनी त्यांना व्‍यक्‍त केलेल्‍या भूमिकेबाबत नक्‍कीच सकारात्‍मक विचार केला जाईल, असे आश्‍वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT