सातारा

सातारा : ‘किसनवीर’चे साखर, बगॅस, अल्कोहोल गेले कुठे?

backup backup

सातारा : पुढारी वृत्तसेवा

किसनवीर कारखान्यावर 1 हजार कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. साखर, बगॅस, अल्कोहोल, मळी शिल्लक नाही. मग कारखान्यातील पैसा गेला कुठे? मदन भोसले यांनीच हा अपहार केला असून हा पैसा कुणाच्या खिशात गेला? या पैशातून प्रचंड संपत्ती कमवली? यामुळेच कारखान्याची अवस्था दयनीय झाली असल्याचा आरोप आ. मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

आ. मकरंद पाटील म्हणाले, किसनवीर 750 कोटी, खंडाळा 125 कोटी, प्रतापगड 44 कोटी असे तब्बल 1 हजार कोटींचे कर्ज व देणी आहेत. या देण्यांमुळेच कारखान्याची अवस्था बिकट झाली आहे. इतर कारखान्यांनी ऊस नेल्यानंतरही कारखाना कार्यक्षेत्रात 14 ते 15 लाख टन ऊस उभा आहे. गतवर्षीचे 56 कोटी रूपये शेतकर्‍यांना न दिल्याने शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. एका बाजूला कर्जाचा डोंगर दुसर्‍या बाजूला कारखान्याकडे साखर, अल्कोहोल, मळी, बगॅस शिल्लक नाही. नुसत्या कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे. मदन भोसले यांचा चुकीचा कारभार, एकाधिकारशाही व भ्रष्टाचारामुळेच कारखाना अडचणीत आला आहे.कामगारांना 22 ते 23 महिने पगारच दिले नसल्याने त्यांना मजुरीला जावे लागत आहे. यामुळेच सभासद हा कारखाना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही मकरंदआबा व नितीनकाकांनी व्यक्त केला.

कारखान्याला कोट्यवधींचा तोटा झाल्याने नेटवर्थ मायनसमध्ये आहेत. त्यामुळेच तीन वर्षांपासून सर्व बँक खाती एनपीएमध्ये गेली आहेत. चुकीचे आरोप करून स्वत:चे पाप आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न मदन भोसले करत आहेत. त्यांच्याकडून कारखान्याचे खासगीकरण केल्याचा आरोप होत आहे. परंतु, कारखान्याचे खासगीकरण होवू देणार नाही, असेही आ. पाटील म्हणाले.

विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. जयंत पाटील यासह अन्य मंत्र्यांशी कारखान्याच्या अडीअडचणी व मदतीसंदर्भात चर्चा केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा कारखाना उर्जितावस्थेमध्ये आणला जाणार आहे.

एप्रिल महिन्यात साखर कारखाने बंद होतात, ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर असतात. इथे मात्र वेगळेच चित्र आहे. महाभागाने एप्रिलमध्ये कारखाना सुरू केला असून कारखान्याची क्षमता 5 हजार मेट्रीक टन असताना 400 ते 500 मेट्रीक टनच उसाचे गाळप होत आहे. 4 ते 5 दिवसांपासून गाळपाविना बैलगाड्यांमधील ऊस पडून आहे. त्यामुळे कारखान्याचा तोटा वाढायला लागला आहे. चुकीच्या पद्धतीने हा सर्व अट्टाहास सुरू असल्याचे मकरंदआबा व नितीनकाकांनी स्पष्ट केले.

कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवण्यासाठी पुन्हा भाग भांडवल उभे करणार आहे. गरज लागली तरी जिल्हा बँकेकडून आर्थिक मदत घेवून हा कारखाना वाचवला जाणार आहे. कारखान्याबाबत मदन भोसलेंनी यापूर्वी अमित शहा यांची भेट का घेतली नाही? असा सवाल करून आ. पाटील म्हणाले, निवडणूक आली की फोटो काढायचे ते प्रसारमाध्यमांना द्यायचे आणि सभासद शेतकर्‍यांची धूळफेक करावयाची असे प्रकार विरोधकांचे सुरू आहेत. कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर कारखान्याचे पुन्हा ऑडीट करून कायद्यानुसार काम केले जाणार आहे. यावेळी बाबासाहेब कदम, संदीप चव्हाण, हणमंत चवरे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते.

किसनवीरचे तीन विद्यमान संचालक राष्ट्रवादीत

किसनवीर कारखाना व्यवस्थापनाच्या एकाधिकारशाहीला कंटाळून तीन संचालकांनी तर एका माजी पंचायत समिती सदस्याने मकरंदआबा व नितीनकाकांचे नेतृत्व मानून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामध्ये विद्यमान संचालक सचिन साळुंखे, भाजपचे युवा नेते राहूल घाडगे, संदीप पोळ व माजी पंचायत समिती सदस्य कुमार बाबर यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मदन भोसलेंच्या गटाला धक्का बसला. विद्यमान संचालकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने किसनवीर बचाव शेतकरी पॅनेलला आणखी ताकद मिळाल्याचा विश्वास या पॅनलने व्यक्त केला आहे.

SCROLL FOR NEXT