सातारा

Satara: जिल्हा रुग्णालयामागची साडेसाती संपणार कधी?

रुग्णसेवेच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह : लाचखोरीच्या घटनांनी संताप

पुढारी वृत्तसेवा
विशाल गुजर

सातारा : गरिबांचे आरोग्य मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा सध्या डागाळत चालली आहे. गेल्या सहा महिन्यांत तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असतानाच बुधवारी एक जण लाच घेताना सापडला आहे. महिनाभरात लाचखोरीच्या दोन घटनाउघडकीस आल्या. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामागची साडेसाती संपणार कधी? हा प्रश्न आहे. या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून रुग्णसेवेच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गरिबांचे आरोग्य मंदिर म्हणून जिल्हा रुग्णालयाची वेगळी ओळख आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील अनेक रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालय काहींच्या भानगडीमुळे बदनाम झाले आहे. दि. 9 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे निलंबित झाले होते. यानंतर एक दिवसांपूर्वी विजापूर येथील अल्पवयीन मुलीची प्रसूती अन्‌‍ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. हे कमी की काय म्हणून एका महिन्यात दोन वेळा मृतदेह अदलाबदल होण्याच्या घटना घडल्या.

अर्भक प्रकरण कोल्हापूर खंडपीठात गेल्याने आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी दखल घेत चौकशी समिती नेमली. या समितीने चौकशी करत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. युवराज करपे व स्त्रीरोग तज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यावर ठपका ठेवला. याचा अहवाल शासनाकडे गेल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत कोल्हापूर खंडपीठात सुनावणी सुरु आहेत. अवघ्या महिनाभरात लाच घेणाऱ्या दोघांना जेलची हवा खावी लागली.

असे असताना एकाचे वैद्यकीय बिल सिव्हील हॉस्पिटलमध्ये मंजूर करुन घेण्याचे काम होते. यासाठी तक्रारदार हे सहाय्यक अधीक्षक वर्ग 2 चे असलेले अधिकारी श्रीनिवास जोशी यांना भेटले. संबंधित मेडीकल बिल मंजूर करुन देण्यासाठी जोशीने लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी एसीबी विभागात तक्रार दिली. एसीबी विभागाने तक्रार दाखल करुन घेत पडताळणी केली असता 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले. लाचेची रक्कम बुधवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सायंकाळी ट्रॅप लावला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे लागलेली साडेसाती कधी संपणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT