सातारा : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात शासकीय कर्मचारी संघटना बुधवारी रस्त्यावर उतरल्या. केंद्र शासनाची कामगार संहिता ही कर्मचार्यांचा आवाज दाबत असून कंत्राटदारी पध्दतीला तीव्र विरोध करण्यात आला. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी कर्मचार्यांनी केली. संपूर्ण देशात हा संप पुकारण्यात आला होता. मात्र, त्याचा फारसा परिणाम सातार्यात दिसला नसला, तरी कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरल्याने बुधवार ‘आंदोलन डे’ ठरला.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ व सेवानिवृत्त कर्मचारी संघटना केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. जुनी पेंशन योजना लागू करावी तसेच कंत्राटदारी पध्दतीद्वारे होणारी कर्मचार्यांची पिळवणूक थांबवावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी गणेश देशमुख, काका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविकास संघातर्फे सातार्यात मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी केंद्र शासनाच्या आयसीडीएस स्कीमचे काम करत आहेत. या कर्मचार्यांना सध्याच्या स्थितीत जे मानधन मिळत आहे, ते अल्प आहे. त्यांची निष्ठा त्याग व कठोर परिश्रम लक्षात घेऊन त्यांना 26 हजार रुपये वेतन तसेच मदतनीस यांना अठरा हजार रुपये वेतन द्यावे. सरकारी कर्मचार्यांप्रमाणे नोकरी पश्चात मासिक पेन्शन व महागाईचा विचार करता ग्रॅज्युएटी मंजूर करण्यात यावी. लाडकी बहीण योजनेच्या कामाचे भत्ते मदतनीस बहिणींना अद्याप मिळाले नाही.
तसेच अंगणवाडी सेविका यांची 50 टक्के रक्कम अद्याप प्रलंबित आहे ही रक्कम तातडीने अदा करावी, अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. अॅड. नदीम पठाण, सुजाता रणवरे, माया जगताप, सुरेखा डोळसे, सुरेखा शिंदे, वर्षा पवार, मालन जाधव, छाया पन्हाळकर, अर्चना अहिरेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
शालेय पोषण आहार कर्मचारी यांचे मानधन वाढ करावे, त्यांना सरकारी कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेतर्फे सातार्यात निदर्शने करण्यात आली. मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन देखील देण्यात आले. आयटक कौन्सिल सदस्य कविता उमाप, शिवाजीराव पवार, नदीम पठाण, विठ्ठल सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्च काढण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करून राज्यव्यापी देशव्यापी संपात सहभाग घेण्यात आला. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कस फेडरेशन संघटनेचे राज्य संयुक्त सचिव कॉ. नानासाहेब सोनवलकर, राव शिंदे, कॉ. रवींद्र साबळे, प्रशांत वाघ, भाऊसाहेब मोठे, प्रशांत यादव, राजेंद्र रासकर, कांबळे, सुरेश माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.