पावसाच्या पुनरागमनाने दिलासा 
सातारा

Satara Rain : पावसाच्या पुनरागमनाने दिलासा

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत : शहर परिसरातील रस्ते जलमय

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम भागात रविवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सातारा, महाबळेश्वर, जावली, वाई, कराड, पाटण, खटाव, खंडाळा तालुक्यांत पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सातारा शहर व परिसरातील रस्ते जलमय झाले होते. रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेत्यांची तारांबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. दिवसभर कडक ऊन तर अधूनमधून ढगाळ वातावरण त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला. मात्र, रविवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण तयार झाले होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली. साताऱ्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. जोरदार पावसाच्या सरीमुळे रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. शहर व परिसरातील रस्ते जलमय झाले होते. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सुमारे दोन तासांहून अधिक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. बॉम्बे रेस्टाॅरंट परिसरात पाणी साचल्याने पाण्याचे तळे निर्माण झाले होते. त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. रविवार बाजाराचा दिवस असल्याने सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत व्यावसायिकांची ताराबंळ उडाली.

उघड्यावर विक्रीसाठी बसलेल्या व्यापाऱ्यांचे साहित्य पावसामुळे भिजले. पोवईनाक्यावर पाण्याचे लोटच्या लोट वाहताना दिसत होते, त्यामुळे परिसर जलमय झाला होता. सुमारे दोन तास शहर व परिसराला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. जिल्ह्यात खंडाळासह अन्य ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसामुळे खोळंबलेल्या पेरणीला वेग येणार आहे. मात्र, अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT